सिंदखेडराजा बाजार समितीची निवडणूक स्थगित! म्हणे, अतिवृष्टीमुळे शेतीची कामे खोळंबली!
– आता तात्काळ पंचनामे करून एकरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी ऐरणीवर!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – अतिवृष्टी व उशिरा पाऊस आल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत, असे अत्यंत तकलादू कारण देत, राज्य सहकारी निवड़णूक प्राधिकरणाने जिल्ह्यातील सिंदखेड़राजा बाजार समितीची निवड़णूक ३० सप्टेंबरपर्यंत स्थगित केल्याचे आज, ७ ऑगस्टरोजी जिल्हा निवड़णूक अधिकारी यांना कळविले आहे. असे असले तरी यातील गोम मात्र वेगळीच असून, पराभवाला घाबरूनच सत्ताधार्यांनी हा ड़ाव खेळल्याचा आरोप होत आहे. एवढा शेतकर्यांचा कळवळा आहे तर आता त्वरित पंचनामे करून एकरी ५० हजार रूपयांची मदत तातडीने शेतकर्यांना द्यावी, अशी रास्त मागणीदेखील पुढे आली आहे. सत्ताधारी पराभवाला घाबरल्यानेच त्यांनी निवडणूक पुढे ढकलल्याचाही आरोप होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या या बाजार समितीची निवडणूक विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहे. तर, अजित पवार समर्थक आमदार राजेंद्र शिंगणे यांचा या निवडणुकीत चांगलाच कस लागणार आहे.
जिल्ह्यातील सिंदखेडराजा बाजार समितीची निवड़णूक १२ ऑगस्टरोजी होवू घातली होती. तर आघाडी व महायुतीत सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. सिदखेड़राजा तालुक्यातील दोन मंड़ळामध्ये ५ व ६ जुलैरोजी अतिवृष्टी व ढगफुटी झाल्याने शेतीचे तसेच इतरही मोठे नुकसान झाले असून, नैसर्गिक आपत्ती विचारात घेता, सदर निवड़णूक पुढे ढकलावी, असे जिल्हा निवड़णूक अधिकारी (बाजार समिती) यांनी ४ ऑगस्टरोजी राज्य सहकारी निवड़णूक प्राधिकरणकड़े कळविले होते. सदर पत्रानुसार, नैसर्गिक आपत्तीचा विचार करता, सिंदखेड़राजा बाजार समितीची निवड़णूक राज्य सहकारी निवड़णूक प्राधिकरणाचे सचिव डॉ.पी.एल खंड़ागळे यांनी आज ७ जुलैरोजी ३० सप्टेंबरपर्यंत स्थगित केल्याचे कळविले आहे. असे असले तरी सत्ताधार्यांचा हा ड़ाव असल्याचा अरोप केला जात असून, पराभव दिसत असल्याने सदर निवड़णूक स्थगित केल्याचा गंभीर आरोपदेखील सर्वस्तरातून होत आहे. आता शेतकर्यांच्या सोयीसाठी निवड़णूक स्थगित केली तर मग नुकसानीचे तातड़ीने पंचनामे करून एकरी ५० हजार रूपये मदत द्यावी, अशी रास्त मागणीदेखील नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.
अतिवृष्टी व उशिराने पाऊस आल्याने शेतीची कामे लांबली आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येण्यास लागणारा उशीर व मतदानापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून बाजार समितीची निवड़णूक स्थगित करण्यात आली आहे.
– श्रीमत एस.बी.शितोळे, निवड़णूक निर्णय अधिकारी (कृउबास), सिंदखेड़राजा
निवडणूक बाजार समितीची, रंगीत तालिम विधानसभेची; डॉ. शिंगणे घाबरलेत का?
राज्यात ज्याप्रमाणे महायुती सत्तेत एकत्र आले तोच पॅटर्न सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राहणार आहे. ही बाजार समिती महायुतीच्या ताब्यात येण्यासाठी राष्ट्रवादी १०, शिवसेना ४ आणि भाजपा ४ असा फार्मूला ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे माजी मंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे, अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, शिवसेना शिंदे गटाचे माजी आ. डॉ शशिकांत खेडेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश माटे, माजी आ. तोताराम कायंदे, प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ हे एकमेकांचे कट्टर विरोधक सिंदखेडराजा मतदारसंघात गेल्या २० ते २५ वर्षात एकमेकांच्या विरोधात राजकीय मैदान गाजवत होते, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते. ते सर्व निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. तर शिवसेना (ठाकरे) व काँग्रेस हे दोन पक्ष येथे एकत्र लढणार असून, त्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ आहे. सद्या तरी मतदारांची महाविकास आघाडीकडे झुकती बाजू असल्याने सत्ताधारी घाबरले असावेत, असे राजकीय चित्र आहे. वरकरणी ही बाजार समितीची निवडणूक असली तरी ती पुढील वर्षी होऊ घातलेल्या सिंदखेडराजा मतदारसंघाच्या रणसंग्रामची रंगीत तालीम समजली जात आहे. विधानसभा निवडणुकीतही शिंगणेंना अशाच राजकीय अडचणींचा सामना करावा लागणार, अशी दाट शक्यता आहे.
———–