रविकांत तुपकरांनी मीडियासमोर न बोलता शिस्तपालन समितीसमोर बोलावे!
– पुण्यात ८ ऑगस्टला शिस्तपालन समितीची बैठक, रविकांत तुपकरांना बोलावले!
पंढरपूर (तालुका प्रतिनिधी) – रविकांत तुपकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर न बोलता शिस्तपालन समितीसमोर बोलावे. पुण्यात ८ तारखेला या समितीची बैठक आहे, असे सांगून तुपकरांच्या माध्यमातून संघटना हायजॅक करण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ते पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, संघटनेवर दावा सांगितला आहे. याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, की ‘हा संघटनात्मक आणि बुलढाणा जिल्ह्यातील वाद आहे. पुण्यात ८ ऑगस्टला शिस्तपालन समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. तेव्हा याविषयावर पडदा पडेल. रविकांत तुपकर यांनी माध्यमांसमोर न बोलता समितीच्या बैठकीत बोलावे.’ रविकांत तुपकर यांच्यापाठीमागे भाजपाचा हात आहे का? या प्रश्नावर राजू शेट्टी म्हणाले, की ‘समोर चर्चा केल्यावर कळेल, यापाठीमागे कोण आहे. अथवा तुपकर यांच्या मनात काय खदखद आहे. एखाद्या कार्यकर्त्यांच्या मनात अस्वस्थता असेल, तर निश्चित व्यक्त करण्याचा अधिकार आहे. ती योग्य व्यासपीठावर व्यक्त करावी. कारण, संघटनेत लोकशाही आहे.’ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटना हायजॅक करण्याचा प्रयत्न आहे का? या प्रश्नावर राजू शेट्टी म्हणाले, ‘स्वाभिमानी हायजॅक होणार नाही. कारण, ती मुळातून तयार झाली आहे. शेतकर्यांतून निर्माण झाली आहे.’
राजू शेट्टी हे संघटनेत रविकांत तुपकरांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याने, शेट्टी आणि तुपकर हे समोर-समोर आले आहेत. ‘जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील कोणत्याही कार्यकर्त्यांशी माझा वाद नाही. माझा आक्षेप हा नेतृत्वाच्या कार्यपद्धीवर आणि भूमिकेबद्दल आहे,’ असे म्हणत रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांना लक्ष्य केले आहे, तसेच संपूर्ण संघटनेवर दावाही सांगितला आहे. या राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर देत, रविकांत तुपकरांच्या पाठीमागे भाजपाचा हात? स्वाभिमानी हायजॅक करण्याचा प्रयत्न? असावा, असा संशय व्यक्त केला आहे.
—————-