Head linesMaharashtraPachhim MaharashtraPolitical NewsPoliticsPunePune

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज, उद्या पुण्यात

– उद्या सहकार विभागाची महत्वपूर्ण बैठक, संकेतस्थळाचेही करणार उदघाटन
– पुणे विमानतळावर मुख्यमंत्र्यांसह दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांकडून जोरदार स्वागत

पुणे (सोनिया नागरे) – केंद्रीय गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे पॉवरफुल नेते अमित शाह हे आज व उद्या (रविवारी) दोन दिवशीय पुणे दौर्‍यावर आहेत. आज पुणे विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, व देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पिंपरी-चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित सहकार विभागाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार असून, यावेळी केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेल्या संकेतस्थळाचे उदघाटन ते करणार आहेत. शाह यांच्या या दौर्‍यात कोणतीही राजकीय चर्चा होणार नसल्याचे भाजपच्यावतीने सांगण्यात आले असले तरी, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही प्रमुख नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून, हे नेते शाह यांची भेट घेणार ओत, असे एका स्थानिक नेत्याने सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकार से समृद्धी’ या संकल्पनेत ठाम विश्वास दर्शवत सहकार मंत्रालयाने देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या अनुषंगाने, सहकार क्षेत्रात व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधक कार्यालयाचे संगणकीकरण केले जात आहे. त्याअंतर्गत निर्माण केलेल्या केंद्रीय सहकार संस्था निबंधक (ण्Rण्ए) कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे ते उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सहकारमंत्री व पूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर ते सहकार विभागाची आढावा बैठकदेखील घेण्याची शक्यता आहे.


दरम्यान, या दोन दिवसांच्या दौर्‍यात त्यांनी बराचवेळ राखीव ठेवला असून, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याशी ते आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा करणार आहेत. यावेळी ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून राजकीय परिस्थितीचा आढावादेखील घेणार आहेत. तसेच, काँग्रेसमधील एक स्थानिक नेता व राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक बलाढ्य नेताही भाजपात प्रवेश करण्याची शक्यता असून, हे दोन्ही नेते अमित शाह यांच्या भेटीची प्रतीक्षा करत असल्याचे वरिष्ठस्तरीय सूत्राने सांगितले. दरम्यान, शाह यांच्या या दौर्‍यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक मार्गात काहीअंशी बदलदेखील करण्यात आलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!