– रेखाताई खेडेकरांसाठी शिवसेनेवर दबावतंत्राचा भाग? : राजकीय सूत्र
– उद्या मुंबईत शिवसेना (ठाकरे), संभाजी ब्रिगेडची महत्वपूर्ण बैठक
बुलढाणा (बाळू वानखेडे) – शिवसेना (ठाकरे) पक्षासोबत युती केलेल्या संभाजी ब्रिगेडला शिवसेनेच्या कोट्यातून बुलढाणा, पुणे, चंद्रपूर व हिंगोली हे चार लोकसभा मतदारसंघ हवे आहेत. संभाजी ब्रिगेडच्या या भूमिकेमुळे लोकसभेची तयारी करणारे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांची चांगलीच गोची झालेली आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या (दि.६) संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांसोबत बैठक घेणार असून, ही बैठक बांद्र्यातील रंगशारदा सभागृहात होणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर या प्रमुख पदाधिकार्यांसह राज्यभरातून ३०० प्रतिनिधी या बैठकीला हजर राहणार आहेत.
शिवसेना व संभाजी ब्रिगेडची राजकीय युती झाली असली तरी, या दोघांमध्ये जागावाटपाबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. यापूर्वी शिवसेना नेते व संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांमध्ये आठ ते नऊ बैठका झालेल्या आहेत. तथापि, रविवारी (दि.६) रंगशारदा सभागृहात आयोजित बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांच्यासह दोन्ही बाजूचे प्रत्येकी ३०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख भाषणासह दोन्ही पक्षांच्या निवडणूक, राजकीय रणनीतीबाबत धोरणात्मक चर्चा होणार आहे. तसेच, जागावाटपाबाबतही भूमिका निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, संभाजी ब्रिगेड हा महाविकास आघाडीचा अधिकृत घटक नसल्याने या पक्षाला शिवसेनेच्या कोट्यातून जागा हव्या आहेत. त्यातही त्यांनी बुलढाणा, पुणे, चंद्रपूर व हिंगोली लोकसभा मतदारसंघ मागितले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
संभाजी ब्रिगेडने बुलढाण्यासह हिंगोली, चंद्रपूर व पुणे या चार लोकसभा मतदारसंघाची मागणी शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे केली असून, बुलढाण्यातून आपण इच्छुक आहोत. यासंदर्भात शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे योग्य निर्णय घेतील. शिवाय, महाविकास आघाड़ीच्या जागावाटवावरही बरेच काही अवलंबून असल्याने काही जागांचे मागेपुढेदेखील होऊ शकते. उद्या मुंबईत संभाजी ब्रिगेड़ पदाधिकारी मेळावा असून, यावेळी उध्दव ठाकरे यांच्यासह इतर नेतेदेखील उपस्थित राहणार आहेत.
– सौरभ पुरूषोत्तम खेडेकर, जनरल सेक्रेटरी, संभाजी ब्रिगेड
बुलढाण्यातील राजकीय समिकरणे सद्या प्रचंड किचकट झालेली आहेत. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्षा सौ. रेखाताई पुरूषोत्तम खेडेकर, शिंदे गटाकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, काँग्रेसकडून हर्षवर्धन सपकाळ आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर हे लोकसभेच्या मैदानात उतरण्यास इच्छुक आहेत. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. त्यामुळे या जागेवरून रेखाताई खेडेकर या प्रबळ दावेदार आहेत. परंतु, शिवसेना (ठाकरे) गटाचे संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर हे गेल्या तीन वर्षांपासून या मतदारसंघात तयारी करत आहेत. तसेच, शिवसेनेतील बंडखोरीमुळे शिंदे गटाविरोधात जिल्ह्यात असलेली संतापाची लाट ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. त्यामुळे यावेळेस बुलढाण्याची जागा शिवसेना (ठाकरे) राष्ट्रवादीकडून परत घेण्याच्या तयारीत आहे. असे असताना आता, संभाजी ब्रिगेडनेही या जागेवर दावा सांगितल्याने प्रा. खेडेकर यांची राजकीय गोची झाली आहे. दुसरीकडे, संभाजी ब्रिगेडकडे या मतदारसंघात सक्षम नेतृत्व नाही. परंतु, ते स्वतंत्र उमेदवार उभा न करता रेखाताई खेडेकर यांनाच पाठिंबा जाहीर करू शकतात. किंवा, सौरभ खेडेकर यांना पुढे केले गेले तर सौ. रेखाताई खेडेकर आपला दावा सोडू शकतात. त्यामुळे संभाजी ब्रिगेडची मागणी ही प्रा. नरेंद्र खेडेकर यांची राजकीय कोंडी करण्यासाठी तर नाही ना? असा सवाल आता निर्माण झालेला आहे. संभाजी ब्रिगेडची मागणी काहीही असली तरी याबाबतचा अंतिम निर्णय हा ज्येष्ठ नेते शरद पवार व उद्धव ठाकरे हेच घेतील, असेही या सूत्राने स्पष्ट केले आहे.
एकूणच या मतदारसंघात महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना उमेदवारी हवी असून, जागावाटपाचे राजकीय त्रांगडे निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शिंदे गटाने आपला दावा कायम ठेवला तर, ही जागा हातातून जाण्याचा धोका पाहाता, या जागेवर भाजपकडून सक्षम उमेदवार देण्याची तयारी चालू आहे. खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांना त्यादृष्टीनेच लोकसभा मतदारसंघात सक्रीय होण्याचे पक्षाने सांगितले आहे. या शिवाय, रविकांत तुपकर यांच्याशीही भाजपचे नेतृत्व चर्चा करत आहेत.
———-