– शाहीर कलावंत व अनुयायांनी उपस्थित राहण्याचे आ. संजय गायकवाड यांचे आवाहन
बुलडाणा (खास प्रतिनिधी) – महाकवी वामनदादा कर्डक यांच्या बुलढाणा शहरात होऊ घातलेल्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा वामनदादांच्या १०२ व्या जयंतीदिनी, १५ ऑगस्ट रोजी भव्यदिव्य स्वरूपात होत आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सोमवार, ७ ऑगस्ट रोजी आ. संजय गायकवाड यांच्या मातोश्री या जनसंपर्क कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीला वामनदादांच्या अनुयांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून शहरात विविध महापुरूषांचे स्मारके साकारल्या जात आहेत. लोककवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या हयातीत विश्वकल्याणाचा विचार मांडून येथील शोषित, पीडित समाजाला जागविण्याचे काम केले. विशेष म्हणजे, वामनदादा कर्डक यांचे मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यावर विशेष प्रेम होते. बुलढाणा व भादोला येथे दीर्घकाळ त्यांचा सहवास लाभला. याच मातीत दादांनी अनेक गिते लिहिली, त्यामुळे बुलढाणा शहरात वामनदादांचेही स्मारक व्हावे, अशी मागणी जिल्ह्यातील शाहीर व वामनदादांच्या चाहत्यांनी आ.गायकवाड यांच्याकडे केली होती. ही मागणी विचारात घेवून आ. गायकवाड यांनी त्यांच्या संकल्पनेतून येथील हुतात्मा स्मारकात पुतळा उभारण्याच्या निश्चित केले. बुध्द जयंतीला या स्मारकाचे भूमिपूजन होऊन या स्मारकाचे काम आता पूर्णत्वास गेले आहे. या स्मारकाचा लोकार्पण सोहळा वामनदादांच्या १०२ व्या जयंतीदिनी १५ ऑगस्ट रोजी भव्यदिव्य स्वरूपात करण्याचे ठरविले आहे. त्यानिमित्ताने सोमवारी, ७ ऑगस्ट रोजी एका बैठकीचे आयोजन केले आहे. आ.गायकवाड यांच्या मातोश्री या जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ वाजता संपन्न होणार्या या बैठकीला जिल्ह्यातील शाहीर, वामदादाचे चाहते व अनुयायांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आ. गायकवाड यांनी केले आहे. शाहिरांच्या गीत गायनाचा कार्यक्रम, विविध वेशभुषातील कलावंतांची रॅली व अन्य कार्यक्रमाचे नियोजन या बैठकीत करण्यात येणार आहे.