BULDHANAVidharbha

‘आम्ही बुलढाणेकरां’च्या मदतीने पूरग्रस्त भारावले!

मुक्या जनावरांचीही घेतली काळजी ; दोन ट्रक चारा वाटप

बुलडाणा (खास प्रतिनिधी) – घेणारे हात निःस्वार्थी असले की, देणारे संकोच न बाळगता भरभरून देतात.. याचा प्रत्यय पुन्हा एकदा ‘आम्ही बुलढाणेकर…’ टीमला दिसून आला. यापूर्वी २०१९ मध्ये सांगली-कोल्हापूर आणि २०२१ मध्ये महाड (कोकण) येथील पूरग्रस्तांना ‘आम्ही बुलढाणेकरां’नी बुलढाणेकर जनतेने दिलेली मदत प्रत्यक्ष पूरग्रस्त भागात जावून पोहोचविली होती. यावेळी जळगांव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात महापुरामुळे उध्वस्त झालेल्या अनेक कुटूंबांना मदतीचा हात देण्यात आला. बुलढाणेकर जनतेकडून गोळा करण्यात आलेल्या मदतनिधीमधून या दोन्ही तालुक्यातील पूरग्रस्तांना ५०० जीवनाश्यक कीट आणि पशूंसाठी दोन ट्रक चारा प्रत्यक्ष गावात जावून वितरीत करण्यात आला.

‘हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे..’, या वैश्वीक तत्वानुसार बुलढाणा शहरातील विविध क्षेत्रातील संवेदनशील मनाची माणसे पूरग्रस्तांना मदतीसाठी एकत्रीत आलीत आणि ‘आम्ही बुलढाणेकर..’ टीम तयार झाली होती. कोल्हापूर-सांगली आणि नंतर महाडमध्ये मदत पोहोचवित आम्ही बुलढाणेकरांनी कौतुकास्पद कार्य केले होते. यावेळेस प्रश्?न जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांचा होता. पुन्हा एकदा ‘आम्ही बुलढाणेकर..’ एकत्रीत आलेत. मदतपेटी तयार करून बुलढाणा शहरात तीन दिवस मदत फेरी काढण्यात आली. दिवसभरातून जमा होणार्‍या निधीचे फेसबुक लाईव्ह करून मोजणी केली जात होती. प्रत्येक दिवशीचा हिशोब सोशल मिडीयावर प्रकाशित करण्यात आली. अदिती अर्बन पतसंस्थेमार्फत सर्व व्यवहार करीत शतप्रतिशत पारदर्शकता जपण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणजे ३ लाख ३० हजार रुपयांपर्यंत मदत निधी गोळा झाला. बुलढाणा शहरातील लोक संवेदनशील आणि कायम सहकार्याच्या भूमिकेत असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यातून पूरग्रस्तांना संसारोपयोगी पडतील अशा वस्तूंची मदत कीट तयार करण्याचा निर्णय सर्वानुमते झाला. त्याचसोबत मुक्या जनावरांसाठीही चारा पाठविण्यात यावा, असे निश्चीत झाले. पूरग्रस्त गावांची आणि त्यातील १०० टक्के प्रभावित कुटूंबाची निवड उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या समन्वयातून करण्यात आली. श्री काळे यांच्या मार्गदर्शनात संग्रामपूरचे तहसीलदार योगेश्वर टोम्पे तसेच जळगांव जामोदच्या तहसीलदार शीतल सोलाट यांच्या सहकार्याने आणि संबंधीत गावचे तलाठी-पोलिस पाटील तसेच गावच्या सरपंच, सदस्य यांच्या सहयोगाने सदर मदत कीट आणि चारा वितरीत करण्यात आला. बुलढाणेकरांनी दिलेला एक-एक रुपया मदत कीटच्या स्वरुपात पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश्य यशस्वी झाला.
मदत कीटचा ट्रक रवाना करतेवेळी शहरातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती. उद्योजक अमोल हिरोळे, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, अदिती अर्बनचे संस्थापक सुरेश देवकर, साहित्यीक अमरचंद कोठारी, सामाजिक कार्यकर्ता शाहिनाताई पठाण, व्यापारी बंटी छाजेड, विजयसिंग राजपूत, विधीज्ञ अ?ॅड. रमेश भागिले, एआरटी सेंटरच्या प्रमुख डॉ. लता बाहेकर तसेच ‘आम्ही बुलढाणेकर..’ टीमचे संयोजक कमलेश कोठारी उपस्थित होते. इतर अनेक जण ‘आम्ही बुलढाणेकर..’ म्हणून सहभागी होते. आम्ही बुलढाणेकर टीमने प्रत्यक्ष गावात जावून चार टप्प्यांमध्ये मदत कीट आणि चार्‍याचे वितरण केले.
मुक्या जनावरांना मिळाला चारा…
मनुष्य स्वतःचे पोट भरण्याची व्यवस्था करू शकतो. पण मुक्या जनावरांचे काय ! पूराचा फटका जनावरांनाही बसला. पशुंसाठी पशुमालकांनी साठवून ठेवलेली कडबा-कुट्टी, चारा वाहून गेला होता. काही ठिकाणी तो पूर्णपणे भिजला. म्हणून दोन्ही तालुक्यात चारा वाटपाचा निर्णय ‘आम्ही बुलढाणेकर’ टीमने घेतला होता. त्यानुसार संग्रामपूर तालुक्यातील कातरगाव, पिंप्री, उकडगाव, मणेर्डी आणि जळगाव जामोद तालुका अंतर्गत गाडेगाव बु, असलगाव (दोन भाग), वाडशिंगी आणि निंबोरा बु. या गावांमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने चारा वाटण्यात आला. गावात विविध प्रकारची मदत आली परंतु कुणीच मुक्या जनावरांचा विचार केला नाही, ती काळजी ‘आम्ही बुलढाणेकर’ यांनी घेतली असल्याची भावस्पर्शी प्रतिक्रिया पशुमालकांनी यावेळी दिली.


या गावांमध्ये मदत कीटचे वाटप..

१७ वस्तूंनी सुसज्ज अशी ही कीट जळगांव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील पूरग्रस्तांना वाटप करण्यात आली. प्रत्यक्ष गावात जावून आम्ही बुलढाणेकरची टीमने पूरग्रस्त कुटूंबाच्या हातात मदत कीट दिली. एकुण ५०० कुटूंबाना मदत कीट वितरीत करण्यात आली. किट वाटप करण्यात आलेल्या गावांमध्ये जळगांव जामोद तालुक्यातील गाडेगांव बु., गाडेगांव खुर्द, पिंपळगांव काळे, मोहीदेपूर, आसलगांव (तीन वेगवेगळ्या भागात), सावरगांव, वाडशिंगी (दोन भाग मिळून), खेर्डी यांचा समावेश आहे. जळगांव जामोद शहरातही शिस्तबद्ध पद्धतीने किट वाटप करण्यात आल्या. संग्रामपूर तालुक्यात अकोली बु., वरवट बकाल आणि मालठाणा या तीन गावांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!