चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील अंत्री कोळी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती ग्रामपंचायतच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला उपसरपंच, माजी सरपंच व काही मोजकेच ग्रामपंचायत सदस्य हजर होते. बाकीचे पदाधिकारी व सदस्य हे आले नाहीत. त्यावरून सामाजिक कार्यकर्ते समाधान हिवाळे व ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच, जे हजर होते त्या पदाधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. महापुरूषांच्या जयंतीला हजर न राहणे म्हणजे या महापुरूषांचा केलेला अवमान आहे, अशी संतप्त टीका उपस्थितांनी केली.
चिखली तालुक्यातील अंत्री कोळी- वाघापूर ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपसरपंचपती विठ्ठल गिरी, माजी सरपंच रामेश्वर वाघ, ग्रामपंचायत सदस्य समाधान मोरे, भारत वाघ यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते समाधान हिवाळे, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे तालुका प्रतिनिधी महेंद्र हिवाळे, प्रकाश केवट, स्वप्नील वाघ, रीना केवट अंगणवाडी सेविका, सुलाबाई मदतनीस हे ग्रामस्थ या कार्यक्रमाला हजर होते. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. परंतु, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जयंती साजरी होत असताना काही ग्रामपंचायत सदस्य हे गैरहजर होते. त्यामुळे समाधान हिवाळे यांनी हजर असलेल्या सदस्यांना खडेबोल सुनावले. या अगोदरही या ग्रामपंचायतीमध्ये असे प्रकार घडलेले आहे. कोणत्याही महापुरुषाच्या जयंती-पुण्यतिथीला सत्ताधारी व विरोधी सदस्य येत नाही, असे का? असा सवाल त्यांनी केला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत या महापुरुषांची नावे घेऊन मते मांगता, त्यांच्या जयंती-पुण्यतिथीला मात्र येत नाही, असा तीव्र संताप त्यांनी व्यक्त केला. यावेळी हिवाळे यांच्यासह इतर ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे व्हिडिओ शुटिंग करून बीडीओंकडे लेखी तक्रार दाखल करण्याचा इशारादेखील दिला आहे. यानिमित्ताने गावातील एक गट मुद्दामहून महापुरूषांची जयंती-पुण्यतिथी साजरी करत नसल्याचे चव्हाट्यावर आले असून, त्यांच्याबद्दल गावात तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे.
———-