Breaking newsCinemaHead linesWorld update

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई (प्राची कुलकर्णी) – तब्बल चारवेळा राष्ट्रीय पुस्कार मिळविणारे, परंतु अलिकडेच आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडलेले प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी रात्री साडेचार वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्येच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. देसाईंच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सफाई कामगार सफाईसाठी त्यांच्या रुममध्ये गेला असता, हा दुर्देवी प्रकार उघडकीस आला. देसाई यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये, इतिहासकालीन मालिकांमध्ये कला दिग्दर्शनाचे काम केले. ते ५८ वर्षांचे होते.

नितीन देसाई यांनी प्रोडक्शन डिझायनर म्हणूनही ‘लगान’, ‘हम दिल दे छुके सनम’, ‘मिशन काश्मीर’, ‘देवदास’, ‘खाकी’, ‘स्वदेस’ आदी सिनेमांसाठी काम केले होते. हे चित्रपट सुपरहिट ठरले होते. सन २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ आणि २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देवदास’ चित्रपटांसाठी त्यांना उत्कृष्ट कलादिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या सिनेमासाठी उत्कृष्ट कलादिग्दर्शक म्हणून ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ मिळाला होता.

नितीन देसाई यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून आपले प्रशिक्षण पूर्ण केले होते. १९८७ सालापासून त्यांनी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचे काम सुरू केले. त्यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते. २०११ मध्ये त्यांनी गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘हॅलो जय हिंद’ या मराठी चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.

२००५ साली त्यांनी कर्जतमध्ये त्यांचा एन. डी. स्टुडिओ उभा केला. याच स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. स्टुडीओतील कर्मचार्‍यांना आत्महत्या केल्याचे कळल्यानंतर त्यांनी लगेचच स्थानिक पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. देसाई यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. तथापि, आर्थिक चणचणीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा आहे. देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. त्यांची अशा प्रकारे आत्महत्या करणे, हा सर्वांसाठी एक मोठा धक्का ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!