BULDHANAVidharbha

तब्बल तेरा हजारांवर नागरिकांचे ‘डोळे लाल’!

बुलढाणा (प्रशांत खंडारे) – जिल्ह्यात डोळ्यांची साथ आली आहे. वेळेत उपचार न झाल्यास डोळ्यांचे आजार गुंतागुंतीचे होतील. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर डोळ्याचे रुग्ण आढळत असून, बालकांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये १३ हजार ६९३ रुग्ण बाधित झाले आहे. त्यापैकी सहा हजार ८५६ उपचारानंतर बरे झाले आहेत. एक ऑगस्टरोजी दिवसभरात २२२ रुग्णांची भर पडली असून, नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात पावसाने बर्‍यापैकी जोर धरलेला असतांना अनेकांना सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास जाणवत आहे. दूषित पाण्यामुळे काहींना मळमळ, उलटी असा त्रास होत आहे. हा त्रास सुरू असतांना सध्या जिल्ह्यात डोळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. डोळ्यांतून पाणी येणे, डोळ्याला खाज येणे, डोळे सुजणे, अशा वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शालेय वर्गात एखाद्या विद्यार्थ्याला डोळे येण्याचा त्रास झाल्यास इतर विद्यार्थ्यांनाही तो होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण वाढले आहे. ज्या विद्यार्थ्यांला त्रास होत असल्याचे लक्षात येते, त्यांच्या पालकांना दूरध्वनीवरून माहिती देत घरी पाठविले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात डोळ्यांची साथ येण्याचे प्रमाण पाहता, जिल्हा आरोग्य विभागाकडून मेगा कॅम्प घेऊन उद्भवलेल्या संबंधित रुग्णांच्या आजारांवर सनियंत्रण केल्या जात आहे.

संग्रामपूरच्या शिबिरात ३७८१ रुग्णांची नोंद
यापूर्वी घेण्यात आलेल्या शिबिरात विविध आजारग्रस्त ३७८१ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये१८६७ डोळ्यांच्या आजाराचे रुग्ण आढळले. सर्दी, ताप, खोकल्याचे ५५३ रुग्ण तर पाण्यामुळे उद्भवलेल्या आजारांचे २२३ रुग्ण आढळून आले. ११८ इतर रुग्ण मिळून एकूण ३७८१ रुग्णांवर औषधोपचार करण्यात आला.

जळगाव जामोद येथील शिबिरात ३४९१ रुग्णांची नोंद
जिल्हा आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या शिबिरात ३४९१ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये हगवण ८१०, ताप २४४, डोळ्यांच्या आजाराचे १३३१ इतर आजाराचे १८५५ असे एकूण ३४९१ रुग्ण आढळले. त्यांच्यावर औषध उपचार करण्यात आला.

जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ६९३ रुग्ण डोळ्यांच्या आजाराने बाधित झाले आहे. त्यापैकी ६८५६ रुग्ण बरे झाले. जळगाव जामोद संग्रामपूर या पूरग्रस्त भागात शिबिरे घेण्यात आली. व घेण्यात येत आहे. झालेल्या शिबिरांत जिल्हास्तरावरून आय ड्रॉप्स व इतर औषधे उपलब्ध करून देण्यात आली. ऑफथालमिक असोसिएशन बुलढाणाकडून डॉ. शोन चिंचोले यांनी २००० आय ड्रॉप्स उपलब्ध करून दिले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते व मी स्वतः भेट देऊन आजारांवर सनियंत्रण केले आहे.
डॉ. प्रशांत तांगडे पाटील, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी बुलढाणा.

डोळे आल्यावर काय काळजी घ्यावी?

वातानुकुलित वातावरणात हा संसर्ग झपाट्याने पसरतो. डोळे आलेल्या व्यक्तीने वापरलेल्या रुमाल, टिशू, साबण, टॉवल अशा वस्तू इतरांनी वापरू नयेत. डोळ्यांचा संसर्ग चार-पाच दिवस टिकतो. मग बरा होतो. पण या आजारावर स्वतःच्याच मनाने घरगुती उपाय करू नयेत. तुरटी, दूध, काजळ आणि इतर वस्तूंचा वापर करू नये. औषधांच्या दुकानातून कोणतेही डोळ्यांचे ड्रॉप अंदाजाने वापरू नयेत. संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!