Breaking newsBULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

शेतकरी नेते रविकांत तुपकरांचे पंख छाटण्याचे राजू शेट्टींचे प्रयत्न?

– संग्रामपूर येथील मोर्चाला तुपकरांची गैरहजेरी अनेकांना खटकली!
– पूरग्रस्त भागात सर्वाधिक पहिले धावून जाणारे तुपकर असताना, शेट्टींनी संग्रामपूरमध्ये येऊन काय साधले?

बुलढाणा (बाळू वानखेडे) – एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुलढाणा लोकसभेसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना उमेदवारी जाहीर केली असतानाच, संग्रामपूर येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष (युवा आघाडी) प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चाला संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वतः हजेरी लावत, राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. परंतु, या मोर्चात रविकांत तुपकर यांचा समावेश नव्हता. तसेच, संग्रामपूर, जळगाव जामोद या पूरग्रस्त तालुक्यांत तुपकर यांनी तातडीने धाव घेत, दोन दिवस स्वतः मुक्काम ठोकला. पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय शिबीर घेऊन तीन लाखांची औषधी मोफत वाटली. तुपकर धावून आल्याचे पाहून जिल्ह्यातील इतर नेते, आमदार, खासदार या भागात फिरकले. त्याची साधी दखलही राजू शेट्टी यांनी घेतली नाही, यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह जिल्हावासीयांत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. खा. राजू शेट्टी हे तुपकरांविरोधात जिल्ह्यात पर्यायी नेतृत्व उभे करून तुपकरांचे पंख छाटत आहेत का, असाही सवाल आता निर्माण झाला आहे. दरम्यान, तुपकर यांनी राजू शेट्टी यांचा डाव उधळून लावण्याची तयारी केली असून, ते शेट्टी यांची साथ सोडण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांनी आज सकाळी ११ वाजता तातडीने आपल्या बुलढाणा येथील जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक बोलावलेली आहे.

सातपुडा पर्वतरांगात झालेल्या मुसळधार पावसाने संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव, मलकापूर तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुराने शेकडो हेक्टर जमीन खरडली गेली असून, तब्बल ४ हजार ३८५ घरांची पडझड होऊन संसाराच वाहून गेलेत. यंत्रणेने तब्बल २१०० जणांचे प्राण वाचविले. २०३ जनावरे मृत्युमुखी पडली. १.६४ हजार ६६७ हेक्टर वरील शेतीपिके उदध्वस्त झाली. १८५ लाख रुपयांचे महावितरण कंपनीचे नुकसान झाले. जळगाव जामोद व संग्रामपुरातील पूरग्रस्तांची अवस्था पाहता, रविकांत तुपकर हे सर्वात प्रथम धावून गेले. त्यांनी दुसर्‍याच दिवशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून परिस्थिती कळवली. तसेच, तातडीच्या मदतीची मागणी केली. मंत्रिमंडळ बैठकीतदेखील ही मागणी मान्य झाली. त्यानंतर शनिवारी (दि.२९) तारखेला राजू शेट्टी यांनी संग्रामपूर तालुक्यात येत संग्रामपूर तहसीलवर काढण्यात आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोर्चाला हजेरी लावली व राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. आपल्याच संघटनेचा प्रदेशाध्यक्ष असलेला नेता ही पूरग्रस्तस्थिती हाताळत असताना, व शेतकरी आणि पीडितांना दिलासा देण्यासाठी झटत असताना राजू शेट्टी यांना पर्यायी आंदोलनाची गरज होती का, हा प्रश्न आता निर्माण झाला असून, रविकांत तुपकर यांची या मोर्चाला नसलेली हजेरी अनेकांना खटकली आहे. मध्यंतरी तुपकर व शेट्टी यांच्यात बिनसले असल्याची राजकीय चर्चा होती. तसेच, बुलढाणा जिल्ह्यातच शेट्टी हे तुपकरांना पर्यायी नेतृत्व उभे करून तुपकरांचे पंख छाटत असल्याचीही चर्चा होत होती. या चर्चेला आता पुष्टी मिळाली आहे. घाटाखाली प्रशांत डिक्कर या युवा नेतृत्वाला राजकीय बळ देऊन राजू शेट्टी हे तुपकरांना सक्षम पर्याय जिल्ह्यात उभे करत असावेत, असा संशय आता सर्वसामान्य व्यक्तीला येऊ लागला आहे. असे असले तरी रविकांत तुपकर हे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या गळ्यातील ताईत असून, शेतकरी त्यांचेच नेतृत्व स्वीकारतील, हीदेखील वस्तुस्थिती आहे.

संग्रामपूर येथे बोलताना राजू शेट्टी म्हणाले होते, की राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला मदतीच्या नावावर पाने पुसली आहेत. सरकार कधीच मदत करत नसते, सरकार फक्त मदतीची घोषणा करत असते. त्यामुळे या अतिवृष्टीग्रस्त लोकांना तात्काळ मदत देण्यात यावी, अन्यथा आम्ही सरकारच्या उरावर बसू, असा इशारादेखील शेट्टींनी दिला होता. बुलढाण्याचे पालकमंत्री किंवा लोकप्रतिनिधी यांना लोकांचे काही देणंघेणे नाही. जनता मेली काय आणि राहिली काय यांना काही देणे घेणे नाही, ते फक्त राजकारणात मश्गूल आहे. दुसर्‍याचा पक्ष फोडण्यात मश्गूल आहेत, अशी टीकादेखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी याप्रसंगी केली होती.


राजू शेट्टीसाहेब आमचे नेते आहेत. ते येणार असले किंवा एखादा कार्यक्रम असला की आम्ही फक्त आवाहन करतो. कोणाला पर्सनली निरोप देत नाही. आवाहनावरच कार्यकर्ते येतात. मोर्चाला प्रदेश महिला आघाड़ी अध्यक्षा पूजाताई मोरेसह प्रदेश स्तरावरचे काही पदाधिकारी आले होते. त्यांनासुध्दा निरोप दिला नव्हता. आपल्या व्यस्त शेड्युलमुळे आजच्या बुलढाणा येथील बैठकीला जाणे शक्य नाही.
प्रशांत डिक्कर, प्रदेशाध्यक्ष, युवा आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नेत्यांची विदर्भाला गरज आहे का?

शेतकरी संघटनेच्या चळवळीची सुरूवातच स्व. शरद जोशी यांनी विदर्भातून केली होती. या चळवळीने अनेक चांगले नेते राज्याला दिले. आजही शेतकरी नेते तथा देशोन्नतीकार प्रकाशभाऊ पोहरे, विजय जावंधिया, रविकांत तुपकर हे शेतकरी चळवळीचे नेतृत्व करत आहेत. अशा परिस्थितीत पश्चिम विदर्भातील नेत्यांची विदर्भाला गरज आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र हा सधन भाग असून, तिकडील शेतकर्‍यांच्या समस्या वेगळ्या आहेत. तर विदर्भाला शेतकरी आत्महत्यांचा कलंक लागलेला असून, इकडील समस्या वेगळ्या आहेत. ज्यांना इकडच्या शेती-मातीचा, शेतकर्‍यांवर असलेल्या संकटांचा अनुभव, अभ्यास आहे, असेच नेतृत्व विदर्भ स्वीकारणार आहे. अशा परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील नेतृत्व विदर्भाने स्वीकारणे अशक्यप्राय बाब आहे.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!