– नव्या रुग्णवाहिकेमुळे होणार सुखकर प्रवास!
बुलढाणा (प्रशांत खंडारे) – विपन्नावस्थेतील चार मनोरुग्णांची यातनेतून मुक्तता करीत, ते बरे झाल्याने त्यांना वरवंड येथील दिव्यसेवा प्रकल्पातून बाहेर राज्यातील त्यांच्या स्वगृही पाठविण्यासाठी दिव्या फाउंडेशन सज्ज झाले आहे. नव्यानेच घेतलेल्या रुग्णवाहिकेने मनोरुग्णांना आज, १ ऑगस्टच्या संध्याकाळी पोहोचविणार असल्यामुळे या चारही मनोरुग्णांसाठी आता ‘मोकळे आकाश’ झाले आहे. कर्नाटक येथील रेखा, सोलापूर येथील सोनाली, सिंधुदुर्ग येथील दशरथ, बेंगळुरू येथील शेट्टी हे चार मनोरुग्ण बुलढाणा लगतच्या वरवंड येथील दिव्यसेवा प्रकल्पात दाखल करण्यात आले होते. दिव्य सेवा प्रकल्पाच्या टीमने आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता करून या मनोरुग्णांना तज्ञ, डॉक्टरांच्या उपचारासह मायेची ऊब दिली. त्यांच्या प्रकृतीत व शारीरिक आणि मानसिक परिस्थितीत बर्यापैकी सुधारणा झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांशी बोलणे करून संस्थापक अध्यक्ष अशोक काकडे यांनी या चारही मनोरुग्णांचे त्यांच्या स्वगृही पुनर्वसन करण्याचे ठरविले आहे.
दिव्या फाउंडेशन अंतर्गत कार्यान्वित असलेल्या वरवंड येथील दिव्यसेवा प्रकल्पात आज रोजी ९१ मनोरुग्ण दाखल आहेत. रखरखत्या उन्हात, भीज पावसात शरीराला ठिकठिकाणी जखमा झालेल्या, रस्त्यात पहुडलेल्या स्वतःचे नाव न सांगता येणार्या अत्यंत दयनीय अवस्थेत असलेल्या बेघर, निराधार मनोरुग्णांना दिव्यसेवा प्रकल्पात दाखल करून घेतल्या जाते. त्यामुळे दिव्यसेवा प्रकल्प अशा मनोरुग्णांचे हक्काचे घर झाले आहे. समाजाने झिडकारलेल्या मनोरुग्णांना ‘माणूसपण’ देण्याचे काम दिव्य सेवा प्रकल्प करीत आहे. अनेक मनोरुग्णांच्या कुटुंबीयांचा थांगपत्ता नसतो. काही मनोरुग्णांची प्रकृती बरी झाली की त्यांना आपले कुटुंब आणि घराची आठवण होते. तेव्हा दिव्य सेवा प्रकल्पाची टीम त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्या मनोरुग्णांना त्यांच्या स्वगृही पाठवीत असते. असेच कर्नाटक येथील रेखा, सोलापूर येथील सोनाली, सिंधुदुर्ग येथील दशरथ, बेंगलोर येथील शेट्टी हे चार मनोरुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घेऊन आज १ ऑगस्ट च्या सायंकाळी लोकवर्गणीतून नव्यानेच खरेदी करण्यात आलेली रुग्णवाहिका त्यांच्या घराकडे रवाना होणार आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष अशोक काकडे व ज्योती काकडे यांनी दिली.