फुले, गांधींच्या पुतळ्यांना दुग्धाभिषेक; मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेच्याविरोधात जनआक्रोश!
बुलढाणा (प्रशांत खंडारे) – थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल त्यांचा देऊळगाव माळी येथे ३१ जुलैरोजी संध्याकाळी विठ्ठल मंदिरात समोर जनआक्रोश करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. सुरुवातीला सर्वप्रथम तरुणाई फाउंडेशनच्यावतीने माजी सरपंच अशोक गाभणे, सावता माळी मित्र मंडळाचे अध्यक्ष पवन गाभणे, विजय भराड, अनिल कलोरे, डॉ.शिवशंकर बळी, गजेंद्र गवई, संतोष मगर, कैलास राऊत यांच्याहस्ते महात्मा फुले व महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पाण्याने स्वच्छ धुऊन दूधाअभिषेक करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी महात्मा फुले व महात्मा गांधी यांचा जयजयकार करण्यात आला. गावकर्यांनी संभाजी भिडे उर्फ कुलकर्णीला अटक करण्याची मागणी केली.
हे आंदोलन तरुणाई फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संभाजी भिडे उर्फ कुलकर्णी याने महात्मा फुले, महात्मा गांधीं, यासह अनेक महापुरुषांबद्दल निंदनीय वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा ठिकठिकाणी जाहीर निषेध होत आहे. देऊळगाव माळी येथे संभाजी भिडे मुर्दाबादच्या घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते मधुकर लोणकर महाराज, गजेंद्र गवई, अनिल कलोरे, भीमराव गवई, भास्कर गवई, तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास राऊत यांनी आपल्या भाषणातून संभाजी भिडे यांचा जाहीर निषेध व्यक्त केला. आंदोलनस्थळी मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिंगटे यांच्या नेतृत्वात पोलीस प्रशासनाच्यावतीने तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी गावातील पंकज लोणकर, संतोष बळी, संतोष मगर, दत्ता काळे, पोलीस पाटील गजानन चाळगे, त्र्यंबक आप्पा जटाळे, संजय जमधाडे, रवी गाभणे, पांडुरंग मगर, पांडुरंग संस्थानचे अध्यक्ष बाबुराव बळी, उपाध्यक्ष तुकाराम मगर, विश्वस्त डॉ. शिवशंकर बळी, अन्वेकर, पप्पू मगर, भिमाआप्पा फिस्के, केशव राऊत यासह तरुणाई फाउंडेशन व सावता माळी मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व अनेक गावकरी उपस्थित होते.