वर्धा (प्रकाश कथले) – देवळी येथील नायब तहसीलदार किशोर शेंडे यांना आज, मंगळवारी तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. किशोर शेंडे असे ‘त्या’ लाचखोर नायब तहसीलदारांचे नाव असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
देवळी येथील एका इसमाच्या शेतीच्या आपसी वाटणीपत्रासाठी नायब तहसीलदार किशोर शेंडे यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. परंतु सदर इसमाची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता, ‘शेंडे’ यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देवळी येथील तहसील कार्यालयात सापळा रचला आणि तीन हजार रुपयांची लाच घेताना नायब तहसीलदार किशोर शेंडे यांना रंगेहात अटक केली. याप्रकरणी त्यांच्यावर देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उद्या बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.