Breaking newsHead linesPolitical NewsPoliticsPuneWorld update

‘गुरूने शिष्याची पाठ थोपाटली’!; राज्याच्या राजकारणात तर्कविर्तकांना उधाण!

– राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर; रस्त्यांवर मात्र मोदींविरोधात आंदोलन!

पुणे (सोनिया नागरे) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात आज टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. पुणेरी पगडी, सन्मानपत्र, गीतारहस्य, दैनिक केसरीचा पहिला अंक, आणि टिळकांची मूर्ती व एक लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराची ही रक्कम मोदींनी नमामि गंगा या अभियानाला सुपूर्त केली आहे. या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस, ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक, विश्वस्त सुशीलकुमार शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमात व्यासपीठावर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. याप्रसंगी पवार यांनी मोदींच्या पाठीवर हात ठेवून, हसून त्यांच्याशी संवाद साधला. पवारांची ही कृती आता राज्यात चर्चेचा विषय ठरली असून, पवारांनी मोदींसोबत व्यासपीठ शेअर करणे शिवसेना (ठाकरे) नेतृत्वाला रूचलेले नाही. काँग्रेसनेदेखील पवारांवर टीका केली आहे. एकीकडे शरद पवार व अजितदादा पवार हे राष्ट्रवादीचे नेते मोदींसोबत व्यासपीठावर होते, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोदींविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनही करत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आपले राजकीय गुरू मानतात. पवारांचे बोट धरून आपण राजकारणात आल्याची कबुली यापूर्वी मोदींनी पुण्यातच दिलेली आहे. टिळक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमास शरद पवारांनी हजर राहू नये, यासाठी शिवसेना (ठाकरे) व काँग्रेसकडून प्रचंड दबाव आला असतानाही पवारांनी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी तर लावलीच, शिवाय भरव्यासपीठावर पंतप्रधान मोदींची पाठ थोपाटली. शिवाय, पवार, सुशीलकुमार शिंदे आणि मोदी यांच्यात काहीक्षण खासगी चर्चाही झाली. त्याला पवारांनी निखळ हसून दाद दिली. या चर्चेचा तपशील हाती आला नसला तरी, हा क्षण पाहून बाजूला बसलेल्या अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या गालावर हास्याची लकेर उमटली होती.

पहिला सर्जिकल स्ट्राईक पुण्यात – शरद पवार

अलिकडच्या काळात या देशाने आणि जवानांनी देशाचे रक्षण करण्यासाठी एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक केला होता. सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आता होते. पण लाल महालात शायिस्तेखानाने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर या देशातला पहिला सर्जिकल स्ट्राईक हा शिवछत्रपतींच्या काळात झाला, ही गोष्ट कोणी विसरु शकत नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी शिवाजी महाराज यांचा गौरव केला. लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शरद पवार बोलत होते.

राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर अजितदादा व शरद पवार हे पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीमागे शरद पवारांचाच हात असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात खासगीत चालू असते. त्यामुळे दादाविरुद्ध साहेब असे चित्र जेव्हा निर्माण होण्यास सुरूवात झाली तेव्हा, अजितदादांनी दोनवेळेस शरद पवारांकडे जाऊन त्यांचे पाय धरले, तसेच आशीर्वाद मागितले. त्यानंतर पवारांच्या भूमिकेत अचानक बदल झाल्याचे दिसून आले.

आतादेखील मोदींसोबत एकाच व्यासपीठावर बसल्याने महाविकास आघाडीसह राज्यात चुकीचा संदेश जाईल, पवारांनी या कार्यक्रमाला जाऊ नये, असे जेव्हा शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी जाहीरपणे सांगितले, तेव्हादेखील पवारांनी शिवसेनेच्या विरोधाला महत्व न देता, मोदींसोबतच्या कार्यक्रमाला हजेरी लावत, मोदींच्या पाठीवर आपला हात ठेवला. एकीकडे, पंतप्रधान मोदींविरोधात देश पातळीवर विरोधी पक्षांची एकत्र मोट बांधली जात असताना, आणि त्यात पवारही सहभागी असताना, दुसरीकडे पवारांचाच पुतण्या अर्धा पक्ष सोबत घेऊन मोदींसोबत गेलेला आहे. आणि त्यातही जाहीरपणे पवार हे मोदींची पाठ थोपाटताना दिसत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतही पवारांच्या भूमिकेबद्दल संशयाचे वर्तुळ निर्माण झालेले आहे.

दरम्यान, टिळक पुरस्कार वितरण सोहळा संपल्यानंतर शरद पवार हे नवी दिल्लीला रवाना झाले. ते दिल्लीला जाण्यासाठी पुणे विमानतळावर दाखल होताच, तेथे अजितदादा पवारदेखील आले. अजितदादांनी शरद पवार यांच्या स्वीय सहाय्यकाकडे साहेबांची विचारणा केली. साहेब आत आहेत का? अशी विचारणा केल्यानंतर अजितदादादेखील आत गेले. यावेळी दादा व पवारसाहेब यांच्यात चर्चा झाल्याची माहिती हाती आली असून, या चर्चेचा तपशील कळू शकला नाही.

आता इंडियाच्या बैठकीसाठी पवारांची राजकीय व्यूहरचना

५ ऑगस्टला मुंबईत नेहरु सेंटर येथे सकाळी ११ वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. बैठकीत विरोधकांची आघाडी इंडिया आणि महाविकास आघाडीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदा महाविकास आघाडीची बैठक होत आहे. शरद पवार यांनी स्वत: ही बैठक बोलावली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सभा आणि प्रचार कसा असेल, याबाबत बैठकीत नियोजन होणार असल्याची चर्चा आहेत. तसेच उद्या (दि.२) सायंकाळी ७ वाजता शिवसेना नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावतीने गरवारे क्लब येथे मविआच्या सर्व आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर बुधवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावतीने ताज हॉटेल, कुलाबा येथे मविआ आमदारांसाठी स्नेहभोज आयोजित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!