सातपुड्यात पुन्हा पावसाचा धूमाकूळ; लेंड़ी नदीला पूर; आलेवाड़ी गावात शिरले पाणी!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – सातपुडा पर्वत रांगांत पावसाने आज (दि.२७) संध्याकाळी पुन्हा धूमाकूळ घातल्याने संग्रामपूर तालुक्यातील लेंड़ी नदीला रात्री आठ वाजेदरम्यान पूर येवून सदर पुराचे पाणी तालुक्यातील आलेवाड़ी गावात घुसल्याने गावकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. रात्रीची वेळ असल्याने कोणताही अंदाज येणे कठीण झाले आहे. दरम्यान, सद्या पाऊस कमी झाला असून, पुराचे पाणी ओसरत असल्याचे सांगून, नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी केले आहे.
गेल्या तीन दिवसापूर्वीच संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस पड़ल्याने नदी-नाल्यांना पूर येवून हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे, तर अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या नुकसानीची अद्याप कोणतीही मदत शासनाकडून मिळाली नाही. सध्या सर्वेक्षण व पंचनाम्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून, शेतकरी नेते रविकांत तुपकर, राजर्षी शाहू परिवाराचे संदीप शेळके यांच्यासह विविध सामाजिक संघटना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेल्या आहेत. अशातच पुन्हा आज, दि. २७ जुलैरोजी सातपुडा पर्वत रांगांत पावसाने धूमाकूळ घातला असून, या पावसामुळे लेंड़ीसह नदी व नाल्यांना पूर आला आहे. लेंड़ी नदीचे पाणी संग्रामपूर तालुक्यातील आलेवाड़ी गावात शिरले असून, यामुळे काही घरांचे नुकसान झाले असून, रात्रीतून काही दुर्देवी घटनेची भीती व्यक्त केली जात आहे. दोन्हीही तालुक्यांना पुन्हा मुसळधार पावसाचा फटका बसला असून, रात्रीची वेळ असल्याने पावसाचा, पुराचा व नुकसानीचा अंदाज येणे कठीण आहे. सध्या पाऊस कमी झाला असून, नदीचे पाणी ओसरत असल्याचे संग्रामपूरचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
————