नाझेर काझींना धक्का; रेखाताई खेडेकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या जिल्हाध्यक्षा
– प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली नियुक्ती
– रविकांत तुपकर राष्ट्रवादीत न आल्यास लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार!
बुलढाणा/मुंबई (बाळू वानखेडे/प्राची कुलकर्णी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटात आहेत, की पक्षाध्यक्ष शरद पवार गटात आहेत? याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर केली नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी पक्षाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार रेखाताई पुरूषोत्तम खेडेकर यांची नियुक्ती केली आहे. तसेच, जिल्हा कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ नेते प्रसेनजीत पाटील व नरेश शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांचे पत्र आज या तीनही नेत्यांना जयंत पाटील यांच्याहस्ते व प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, तसेच इतर मान्यवर व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत आपली भूमिका लवकर जाहीर केली नाही तर, रेखाताई याच पक्षाकडून लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार राहू शकतात.
मराठा सेवा संघाच्या सामाजिक चळवळीतून सक्रीय राजकारणात आलेल्या रेखाताई खेडेकर यांची गणना जिल्ह्यातील बड्या नेत्यांमध्ये होते. चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपने त्यांना उमेदवारी दिल्यावर पहिल्याच निवडणुकीत त्यांनी विजयी पताका फडकविली होती. त्यानंतर या मतदारसंघाचे त्यांनी १५ वर्षे प्रतिनिधीत्व केले. मात्र, २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधत, सिंदखेडराजा मतदारसंघातून निवडून लढविली होती. मात्र, या निवडणुकीत पक्षातील काही नेत्यांच्या नाराजीचा फटका त्यांना बसला आणि शिवसेनेचे शशिकांत खेडेकर विजयी झाले. रेखाताईंनी पराभवानंतर खचून न जाता पुन्हा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिल्हाभर कार्यकर्त्यांची फौज तयार करीत, आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी चालवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा पवार व ज्येष्ठ नेत्यांनी बंडखोरी केल्यानंतर त्या शरद पवार यांच्यासोबत राहिल्यात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष नाझेर काझी हे आ. राजेंद्र शिंगणे यांचे कट्टर समर्थक आहेत. परंतु, त्यांनी आपण दादांसोबत आहोत, की साहेबांसोबत आहोत, याबाबत अद्याप काहीच भूमिका जाहीर केली नव्हती. उलट यापूर्वी शरद पवार यांनी जेव्हा पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, तेव्हा काझी यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन शरद पवारांना साथ दिली होती. काझी हे अजितदादा पवार गटात व त्यातही आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत जाणार असल्याचे गृहीत धरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रेखाताई खेडेकर यांची थेट बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या शिवाय, जिल्ह्याला दोन कार्याध्यक्ष देऊन त्या पदांवर प्रसेनजीत पाटील व नरेश शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, येत्या लोकसभा निवडणुकीसाठी रेखाताई खेडेकर या इच्छुक असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यातही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या डोक्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर हे संभाव्य उमेदवार असल्याचे कळते. तसे, संकेत खा. सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्याकडून मध्यंतरी प्राप्त झाले होते. परंतु, रविकांत तुपकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही संपर्कात असून, भाजपकडून उमेदवारी मिळावी, असा मेसेज त्यांच्याकडून फडणवीस यांना गेला आहे. बुलढाण्याची जागा भाजप लढविणार की शिंदे गट? हेच अद्याप स्पष्ट नसल्याने रविकांत तुपकर यांची राजकीय गोची झालेली आहे. त्यात आता रेखाताई खेडेकर यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर तुपकरांना आपली राजकीय भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करावी लागणार आहे.
————–