शाहू जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचा निकाल घोषित
बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – राजर्षी शाहू मल्टिस्टेट को- ऑप.क्रेडिट सोसायटी आणि राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त २६ जूनरोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला आहे. चार गटांमध्ये ही स्पर्धा झाली. प्रत्येक गटाकरिता तीन पारितोषिके आणि पाच प्रोत्साहनपर बक्षिसे ठेवण्यात आली होती. विजेत्या स्पर्धकांना लवकरच बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे.
राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या संकल्पनेतून आणि अध्यक्ष मालतीताई शेळके यांच्या मार्गदर्शनात ही निबंध स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अ गटात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता आणि त्यांच्यासाठी लोकराजा राजर्षी शाहू महाराज हा विषय होता. सहावी ते आठवीसाठी ब गट आणि त्यांचा विषय राजर्षी शाहू महाराज आणि त्यांचे शैक्षणिक कार्य असा होता. क गटामध्ये आठवी ते बारावीपर्यंतचे स्पर्धक होते आणि त्यांना सामाजिक सुधारणांचे अग्रदूत- लोकराजा राजर्षी शाहू महाराज हा विषय दिलेला होता. अंतिम ड हा खुला गट होता. या गटाकरिता महाराष्ट्रात शेती, उद्योग व सहकाराला चालना देणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज हा निबंधाचा विषय होता. प्रत्येक गटासाठी प्रथम बक्षीस पाच हजार, द्वितीय तीन हजार आणि तृतीय बक्षीस दोन हजार रुपये होते. तर प्रोत्साहनपर पाच बक्षिसे ठेवली होती. स्पर्धेच्या दिवशी २६ जून रोजी सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लिंक सुरु ठेवण्यात आली होती.
असे आहेत विजेते स्पर्धक…
राज्यभरातून १८४५ स्पर्धकांनी निबंध स्पर्धेत सहभाग घेतला. अ गटात प्रथम पारितोषिक हर्षवर्धन माने (सातारा), द्वितीय निकुंज चिलका (जालना), तृतीय कृष्णा भारसाकळे याने पटकावला. ब गटात प्रथम राहुल शिरसाठ, द्वितीय सुप्रिया वानखेडे, तृतीय आदर्श सास्ते(पळसखेड भट) याने मिळवला. क गटात प्रथम गौरव हातेकर(आंबेटाकळी ता. खामगाव), द्वितीय श्रुती पाचपोर (आडगाव जि.अकोला), तृतीय वैदेही पाचपोर (आडगाव जि.अकोला) हिला मिळाला आहे. तर ड खुल्या गटात प्रथम क्रमांक प्रशांत कुलकर्णी(नाशिक), द्वितीय रुपाली कापडेकर (पेठ जि. पुणे), तृतीय क्रमांक अर्चना वाघमारे (भोदेगाव जि. पुणे) आणि दिवाकर बडगुजर (चोपडा जि. जळगाव) यांना विभागून देण्यात आला आहे.
विजेत्यांना त्यांच्याच जिल्ह्यात मिळणार बक्षिसे!
विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. बाहेर जिल्हयातील विजेत्या स्पर्धकांची अडचण लक्षात घेऊन त्यांची बक्षिसे राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या त्या जिल्हयातील शाखेत पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे विजेत्यांना बुलढाण्यात येण्याची गरज पडणार नाही. सर्व विजेत्या आणि प्रोत्साहनपर बक्षिस मिळवणार्या स्पर्धकांचे शाहू परिवारातर्फे कौतुक करण्यात आले आहे.