Head linesMEHAKARVidharbha

मेहकरातील मटनमार्केट आगीत खाक!

– अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात

मेहकर (अनिल मंजुळकर) – मेहकरमधील गजबजलेले बकरा (मटन) मार्केट आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाले. अंदाजे 20 ते 25  दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली होती. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. उघड्यावर होणारी मांसविक्री, रस्त्यावरील अतिक्रमणे हा मुद्दा यानिमित्ताने चर्चेत आला आहे.

शासनाने लाखो रूपये खर्च करून बालाजीरोडवर बकरा (मटन) मार्केट  बांधलेले असून, हे मार्केट अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. मटनविक्री अक्षरशः रस्त्यावर होत असून, आतमध्ये भंगार सामान भरून ठेवलेले आहे. आज दुपारी या मार्केटला अचानक आग लागली. पाहाता पाहाता आगीने रौद्ररूप धारण केले. अंदाजे 20 ते 25 पेक्षा अधिक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली होती. अरूंद रस्ता व अतिक्रमणे यामुळे अग्निशमन दलाच्या बंबांना घटनास्थळी जाण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. तरीही अथक प्रयत्नाने ही आग उशीरा आटोक्यात आली. या आगीत बकरा मार्केटमध्ये असलेले भंगारसाहित्य जसे टायर, प्लास्टिक, ज्वलनशील भंगारवस्तू जळून खाक झाल्या असून, या भंगारामुळे आग वेगाने पसरली होती. घटनास्थळी तहसीलदार भूषण पाटील, मंडळ अधिकारी पंजाबराव मेटांगळे, नगरपालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र वाघमोडे, विद्युत विभागाचे कर्मचारी संतोष राणे, तलाठी शिवप्रसाद म्हस्के आदी दाखल होऊन त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आग इतकी भीषण होती, की दूरवरून ती दिसत होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस कारवाई सुरू होती.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!