– पूरग्रस्तांसाठी स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर बुलढाणा येथे मदत स्वीकारण्यास सुरूवात!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव, नांदुरा व मलकापूर तालुक्यांत पुरामुळे महाभयंकर स्थिती निर्माण झालेली आहे. लोकांची घरे, घरामधील सर्व सामान, शेती, मुलांचे साहित्य सर्वकाही वाहून गेले आहे. नेसत्या वस्त्रानिशी हे लोकं मदतीची वाट पाहात आहे. या लोकांच्या मदतीसाठी धावून या, आणि त्यांच्यासाठी मदतीचे हात पुढे करा, असे आवाहन शेतकरी नेते तथा बुलढाणा जिल्ह्याचे भावी खासदार रविकांत तुपकर यांनी केले असून, त्यांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. बुलढाणा येथील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथे मदत स्वीकारली जात असून, मदतीची पहिली खेप लवकरच पूरग्रस्तांकडे रवाना होणार आहे.
पुरामुळे होत्याचे नव्हते झाले असून, अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे स्वतः पूरग्रस्त भागात तळ ठोकून होते. त्यांनी प्रशासकीय यंत्रणेशी समन्वय साधून पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील इतर नेते जेव्हा फोटोसेशन करण्यापुरते पूरग्रस्त गावांत पोहोचले आणि फोटोसेशन पार पडताच आपल्या आलिशान गाड्यांतून निघून गेले, तेव्हा त्याच पूरग्रस्तांच्या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत मुक्कामी थांबून रविकांत तुपकर यांनी पूरग्रस्तांना धीर देत, त्यांचे आश्रू पुसण्याचे काम केले आहे. पुरामुळे संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव, नांदुरा व मलकापूर तालुक्यांत हाहाकार उडालेला असून, अजून पूरग्रस्त सावरलेले नाहीत. सरकारची मदत अद्यापही मिळालेली नाही. लोकं सरकारी मदतीची वाट पाहात असून, त्यातच डोळ्याच्या साथीचा प्रादूर्भावही सर्वदूर झालेला आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वांनी तातडीचा मदतीचा हात द्यावा, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले असून, या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पूरग्रस्तांना जगविण्यासाठी जिल्हावासीयांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कपडे, औषधे, गृहपयोगी साहित्य, किराणा माल, बिस्किटे, शैक्षणिक दान द्यावे, असे आवाहन करत, उद््ध्वस्त झालेला हा भाग आपल्याला पुन्हा वसवायचा आहे, असे आवाहनही तुपकर यांनी केलेले आहे.
उद्या पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय तपासणी!
दरम्यान, रविकांत तुपकर युथ फाउंडेशनच्यावतीने जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यांतील पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय कॅम्प लावण्यात आला असून, गुरुवारी (दि.२७) सकाळी ८ वाजता काथरगाव, ता. संग्रामपूर व दुपारी एक वाजता मडाखेड खुर्द, ता. जळगाव जामोद येथे हा कॅम्प होणार आहे. या कॅम्पमध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स जसे, डॉ. अंकिता भराड (बुलढाणा), डॉ. प्रवीण टाले (मेहकर), डॉ. विशाल बाजड (मेहकर), डॉ. कल्याणी पाटील (बुलढाणा), डॉ. रितेश बचाटे (मेहकर) हे आपली मोफत सेवा देणार आहेत. या कॅम्पमध्ये पूरग्रस्त रूग्णांची मोफत तपासणी व औषधी वाटपदेखील केले जाणार असून, डोळ्याच्या साथीच्या कचाट्यात सापडलेल्या रुग्णांना मोठा आधार देण्याचे काम रविकांत तुपकर यांनी केले आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वाभिमानी हेल्पलाईन बुलढाणा येथे मदत कक्ष उघडण्यात आला असून, ज्यांना मदत द्यायची आहे, त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. संपर्कासाठी ७०२०८२४००८, ९९२२९१०९००, ९५२७२९०२९७ आदी क्रमांक जारी करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातून इतरही व्यक्ती, संस्था पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करत असल्याने जास्तीत जास्त मदतीचे हात पुढे येणे गरजेचे आहे.