कोळशाने हात काळे; विजय दर्डा, देवेंद्र दर्डांना चार वर्षांची शिक्षा
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) – छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात दिल्ली विशेष न्यायालयाने माजी राज्यसभा खासदार तथा दैनिक लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच, यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोजकुमार जयस्वाल यांनाही चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून, या शिक्षेनंतर दर्डा पिता-पुत्राला सीबीआयने तातडीने ताब्यात घेतले होते.
कोळसा घोटाळ्यात दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने एकूण सहा आरोपींना दोषी ठरवत शिक्षा ठोठावली आहे. या सर्वांविरोधात भारतीय दंडविधानाच्या १०२ (ब), ४२० आणि भ्रष्टाचाराशी संबंधित कलमान्वये गुन्हे सिद्ध झाले आहेत. विशेष न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर दर्डा पितापुत्रासह एका आरोपीला सीबीआयने ताब्यात घेतले होते. या कोळसा घोटाळ्यात माजी खासदार विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांना प्रत्येकी चार वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली असून, त्यांना प्रत्येकी १५ लाखांचा दंडही ठोठावण्यात आलेला आहे. या शिवाय, मे. जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा. लि. कंपनीचे संचालक मनोजकुमार जयस्वाल यांनादेखील चार वर्षांची शिक्षा व १५ लाखांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. तर माजी कोळसा सचिव एच.सी.गुप्ता यांना तीन वर्षांची शिक्षा व १० हजारांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. या प्रकरणात सीबीआयने सर्व दोषींना कठोरात कठोर शिक्षेची मागणी केली होती. कारण, त्यांच्याविरोधात ठोस पुरावे आहेत, असे सीबीआयने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले होते. तर दोषींतर्पेâ त्यांच्या वकिलांनी कमीत कमी शिक्षेची मागणी केली होती. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सत्ताकाळात कोळसा घोटाळा उघडकीस आला होता. कॅगच्या अहवालात हा घोटाळा १०.६० लाख कोटींचा असल्याचा उल्लेख होता. परंतु, संसदेत सादर झालेल्या अंतिम अहवालात हा घोटाळा १.८६ कोटींचा असल्याचे सिद्ध झाले होते.
—-