अंधश्रद्धेची ‘समृद्धी’ वाढविण्याचा प्रकार उधळला; शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल!
– म्हणे, महामृत्यूंजय जापयंत्र गाडले तर समृद्धी महामार्गावर अपघात घडणार नाही!
सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा येथे महामृत्यूंजय मंत्राचा जाप करून संबंधीत यंत्र महामार्गाच्या अपघातस्थळी गाडून, या यंत्रामुळे पाच किलोमीटरपर्यंत कुठलाही अपघात होणार नाही, असा दावा करून अंधश्रद्धा पसरविणारा शिक्षक निलेश आढाव याच्याविरोधात सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अंधश्रद्धा-जादूटोणाविरोधी कायद्यान्वये या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला तातडीने अटक करण्याची मागणी पुढे आली असताना, आता विश्व हिंदू परिषदेने या प्रकरणात उडी घेत, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. महामृत्यूंजय मंत्राचा जाप करणे ही हिंदू धर्मीयांची आस्था असून, ती अंधश्रद्धा कशी, असा सवाल विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी उपस्थित केला. परंतु, आढाव याने पाच किलोमीटरपर्यंत एकही अपघात होणार नाही, हा दावा कोणत्या आधारावर केला, याप्रश्नावर ते काहीच बोलले नाहीत.
पिंपळखुटा येथे समृद्धी महामार्गावर १ जुलैरोजी झालेल्या भीषण अपघातात खासगी ट्रॅव्हल बसला आग लागून २५ प्रवाशांना जळून मृत्यू झाला होता. या प्रवाशांच्या जीवात्म्याला शांतता लाभावी व या अपघातस्थळाच्या पाच किलोमीटर अंतरावर पुन्हा अपघात घडू नये, यासाठी पेशाने शिक्षक असलेल्या निलेश आढाव याने काही लोकांना एकत्र करत अपघातस्थळी महामृत्यूंजय मंत्राचा जाप केला व जापभारीत एक यंत्र तेथे गाडले. तसेच, सोशल मीडियावर बोलताना या यंत्रामुळे पाच किलोमीटर परिसरात एकही अपघात होणार नाही, किंवा बळी जाणार नाही, अशी वल्गना केली. आढाव याची ही कृती सरळसरळ अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोळकर यांनी आक्षेप नोंदविला. त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनंतर सिंदखेडराजा पोलिसांनी निलेश आढाव याच्याविरोधात अंधश्रद्धा-जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. तथापि, हा आढाव अद्याप मोकाट असून, त्याला पोलिसांनी हे वृत्तलिहिपर्यंत अटक केली नव्हती.
तसेच, तो पेशाने शिक्षक असल्याने असले अंधश्रद्धा पसरविणारे व्यक्ती शिक्षण विभागात अद्याप कार्यरत कसे, असाही सवाल निर्माण झाला आहे. एकीकडे, बुलढाणा पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असताना, दुसरीकडे, विश्वहिंदू परिषदेचे मात्र पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पोलिसांनी हिंदूंच्या धार्मिक भावनांवर आघात केला असून, राज्य सरकारने तातडीने हा गुन्हा मागे घेण्याचे आदेश बुलढाणा पोलिसांना द्यावेत, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी केली आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सिंदखेडराजा समृद्धी महामार्गावर १ जुलै रोजी अपघात झाला. या गोष्टीचा संदर्भ घेत निलेश रामदास आढाव राहणार सिंदखेडराजा याने समृद्धी महामार्गावर महामृत्युंजय मंत्राची स्थापना केली व तेथे महामृत्युंजय यंत्राचा जप केला. आता सदर महामृत्युंजय मंत्र यंत्रामुळे पाच किलोमीटर अंतराच्या आत अपघात होणार नाही व अपघात झाल्यास कोणालाही मृत्यू येणार नाही, असा चमत्कारिक दावा २४ जुलै रोजी करून लोकांची दिशाभूल केली. त्याचेकडे अलौकीक शक्ती आहे व लोक त्याच्या आज्ञा पाळण्यास भाग पडतील अशी भावना निर्माण केली आहे. म्हणून निलेश आढाव या इसमाविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूह उच्चाटन करणेबाबत अधिनियम २०१३ कलम २, ५ अन्वये दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक केशव वाघ हे करत आहेत.
‘अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालविकास मार्ग दिंडोरी यांनी हे यंत्र बसवलं आहे. तसंच त्यानंतर त्यांनी हा दावा केला आहे की हे यंत्र बसवल्यानंतर पाच ते दहा किमी.च्या परिसरात अपघात होत नाहीत. जर अपघात झालाच तर ती व्यक्ती दगावत नाही. अशा प्रकारे दैवी शक्तीचा दावा करणे, त्यातून लोकांना फसवणं आणि ठकवणं हा जादूटोणा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा आहे. याबाबत पोलिसांनी दखल घ्यावी म्हणून अंनिसने मागणी केली होती. आमच्या मागणीची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि चौकशी करत आहेत. एका बाजूला कुणावर तरी श्रद्धा असणं आणि त्यातून व्यक्तीला भावनिक आधार वाटणं ही वेगळी गोष्ट आहे. परंतू त्याच्या नावाखाली दैवी चमत्काराचा दावा करणं आणि लोकांना फसवणं हा गुन्हा आहे. त्यामुळे या प्रकरणी कारवाई होणं आवश्यक आहे.’ अशी प्रतिक्रिया अंनिसच्या डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिली.
——