बुलढाणा (संजय निकाळजे) – वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेल्या लोककलावंतांच्या मागण्यांसाठी मंगळवार, दि. २५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोककला सांस्कृतिक मंचच्यावतीने भजन आंदोलन करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविले.
दिलेल्या निवेदनात वृध्द कलावंतांच्या व साहित्यिकांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्यात यावी. लोककलावंतांच्या कार्यक्रमांना रात्रभर स्पीकर वाजवण्यास परवानगी देण्यात यावी. बहुजन समाजातील ज्येष्ठ लोककलावंतांना ‘समाजभूषण’ ‘पदमश्री’ ‘पद्मभूषण’ आदी पुरस्कार देऊन सन्मानित करावे. महाकवि वामनदादा कर्डक यांच्या नावाने ‘लोककलावंत आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करावे. सरकारी घरकुल योजनेत लोककलावंतांसाठी १० टक्के राखीव कोटा ठेवावा. सरकारच्यावतीने दरवर्षी लोककलावंत साहित्य सम्मेलन आयोजित करण्यात यावे. माहिती विभागाचे योजनांच्या प्रचार-प्रसिध्दीचे कार्यक्रम लोककलावंतांना नियमित मिळावे. शासकीय पुरस्कार प्राप्त असलेल्या कलावंतांना साध्या एसटी बस प्रमाणेच ‘शिवनेरी’ ‘शिवशाही’ बसमध्ये मोफत प्रवास करण्याची परवानगी द्यावी. कलावंतांच्या मुलांना व तरूण कलावंतांना सरकारी सेवेत २ टक्के राखीव कोटा ठेवावा, आदी मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनात लोककला सांस्कृतिक मंचाचे शाहीर डी आर इंगळे, शाहीर शिवाजी लहाने, अनिल हेलोडे, केशरताई इंगळे, दिगंबर पवार, सुरेश अवसरमोल, प्रबोधनकार गजाननदादा गवई, देवानंद वानखेडे, रामदास मलवार, संजय निकाळजे, संदीप साळवे यांच्यासह असंख्य लोककलावंत सहभागी झाले होते.