मेरा बुद्रूक परिसरात रोही, रानडुकरांचा हैदोस; सोयाबीन, तूर, उडिद पिके फस्त!
– वन्य प्राण्यांमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसह जीवालाही धोका; शेतकर्यांची वनविभागाकडे तक्रार!
मेरा बुद्रूक, ता चिखली (कैलास आंधळे) – चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक परिसरातील शेतकरी वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे त्रस्त झाले आहेत. शेतात शिरकाव करून वन्यप्राणी पिकांची हानी करतात. येवढेच नाही तर रस्त्यावरून जाताना आमच्या जीवालाही रोही आणि रानडुकरांपासून धोका आहे, अशी शेतकर्यांची तक्रार आहे. संबंधित विभागाकडे तक्रार करूनही ते लक्षतच देत नाही, असेही शेतकर्यांचे म्हणणे आहे. वाडी माळ शिवारातील शेती असणारे केशव सोळंकी यांनी थेट वनविभागाच्या महाराष्ट्र राज्य कार्यालयाला तक्रार अर्ज मेल केलेला आहे, तर मेरा बुद्रूक येथील म्हैसमाळ परिसरातील विजय तोताराम पडघान व मोहन विजय पडघान यांच्या गट नंबर ६४१ व ६४३ यामधील चक्क चार ते पाच एकर सोयाबीन रोही प्राण्यांनी फस्त केली असून हे दोन्ही शेतकरी हवालदिल झालेले आहेत.
वन विभागाने वेळीच दखल घेऊन या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करत, सरकारने शेतीसाठी कुंपण योजना राबवावी, अशी आर्तहाक मेरा बुद्रुकसह परिसरातील शेतकरीवर्गाने राज्य सरकारला दिली आहे. शेतकर्यांची पिके आणि जीव, दोघांचीही काळजी घेण्यासाठी उपाययोजना कराव्या, अशी शेतकर्यांची मागणी आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, लोकप्रतिनिधी वन्यप्राण्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी अनेक वर्ष शेतात राबल्यानंतर कुठेतरी शेतातील पीक आहे ते डोलू लागले होते पण रोही व अन्य व वन्यप्राण्यांनी मेरा बुद्रुकसह परिसरातील अनेक शेतातील सोयाबीन, तूर, उडीद हे फस्त केल्याचे समोर येत आहे. शेतातील पिकांवर वन्यप्राणी एकप्रकारे हल्ला करीत आहेत. पिकाची नासधूस होत असल्याने शेती करावी किंवा नाही, असा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे.
वनविभागाकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज केल्यानंतरही नुकसान भरपाई मिळत नाही. वारंवार असा प्रकार होत असल्यामुळे शेतकर्यांवर संकट आले आहे. या समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न वनविभागाने करावा, अशी मागणी मेरा बुद्रुकसह परिसरातील शेतकर्यांनी केली आहे. चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक व परिसरातील खडका शिवार, मैसमाळ, खोरी शिवार, वाडीमाळ सह परिसरातील मेंडगाव, मनुबाई, अंत्री खेडेकर, चंदनपूर इत्यादी गावात वन्यप्राण्यांमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रोही व रानडुकरे हे प्राणी शेतातील पिके पूर्णतः फस्त करीत असल्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. रात्रंदिवस रोही व रानडुकरांचा हैदोस सुरूच राहतो. बरेचदा रस्त्याने जाणार्या येणार्या लोकांना रोही टक्करसुद्धा देतात. त्यामुळे योग्य वेळेस वन विभागाच्या अधिकार्यांनी वनप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मेरा बुद्रुकसह परिसरातील शेतकरी करीत आहेत.