Head linesVidharbha

वैजूबाभूळगावच्या महिला सरपंचांसह कुटुंबावर गावगुंडांचा प्राणघातक हल्ला; संतप्त ग्रामस्थांचा करंजीत रास्ता रोको!

शेवगाव, जि.नगर (बाळासाहेब खेडकर) – पाथर्डी तालुक्यातील वैजूबाभूळगावच्या महिला सरपंच सौ. ज्योती संतोष घोरपडे यांना व त्यांच्या कुटुंबीयांवर गावातील गावगुंडांनी घरात घुसून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी संतप्त महिला व ग्रामस्थांनी आज सुमारे अर्धा तास करंजी येथे रस्ता रोको आंदोलन केले. या गावगुंडावर तातडीने कठोर कारवाईची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.

पाथर्डी तालुक्यातील वैजूबाभूळगाव येथील सरपंच सौ. ज्योती संतोष घोरपडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील त्यांचे पती, सासरे, दीर तसेच कुटुंबातील लहान मुलांवर गावातील सेवा संस्थेचे चेअरमन बाळासाहेब घोरपडे यांच्यासह इतर सात लोकांनी घरात घुसून प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेनंतर गावात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. आज गावातील संतप्त महिला व पुरुषांनी नगर-पाथर्डी महामार्गावर सुमारे अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केले. वैजूबाभूळगाव येथील सरपंच सौ. ज्योती घोरपडे यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनला यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राजकीय वैमनस्यातून बाळासाहेब बाबासाहेब घोरपडे, ज्ञानेश्वर बाबासाहेब घोरपडे, सुनिल बाबासाहेब घोरपडे, नितीन शिवनारायण घोरपडे, किशोर उत्तम घोरपडे, अंबादास उत्तम घोरपडे, गणेश विठ्ठल घोरपडे, उत्तम नामदेव घोरपडे रा. वैजूबाभूळगाव ता. पाथर्डी यांनी आमच्या घरात घुसून प्राणघातक हल्ला करुन माझ्यासह माझ्या पतीला व माझ्या लहान मुलांनादेखील जबर मारहाण केली. ही मारहाण ग्रामपंचायतच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी व गावात दहशत निर्माण करण्यासाठी करण्यात आली आहे, असे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

ज्या गावगुंडांनी महिला सरपंच व त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला त्या गुंडावर अनेक कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, लवकरच त्यांना गजाआड करू, असे पाथर्डीचे पोलिस उपनिरीक्षक संतोष मुटकुळे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.

आज नगर-पाथर्डी महामार्गावर करंजी येथे झालेल्या रस्ता रोको आंदोलनात मिरीचे माजी सरपंच संतोष शिंदे, रावसाहेब लोहकरे, सुधाकर गुंजाळ, बबनराव गुंजाळ, बापू भवार, दिगंबर गुंजाळ, विठ्ठल दारकुंडे, मनेश घोरपडे, अप्पा वांढेकर, नामदेव नरवडे, प्रतिक घोरपडे, राजेंद्र गुंजाळ, सिंधू घोरपडे, मनिषा घोरपडे, छाया गुंजाळ, निर्मला गुंजाळ, अमोल फुलशेटे, नम्रता गुंजाळ, मिरा भवार, अशोक गुंजाळ, बापू घोरपडे, नामदेव मुटकुळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, महिला व परिसरातील नागरिक हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!