एसटी महामंडळाच्या खटारा गाड्या राजूरघाटही चढेना; घाटात बस पलटी, १० प्रवासी गंभीर जखमी!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – एसटी महामंडळाच्या खटारा गाड्या रस्त्यावर धावत असून, या पैकी एका गाडीला राजूरघाटदेखील चढता आला नाही. गाडीचे ब्रेकच फेल झाल्याने ही गाडी मागे येऊन रस्त्याच्या कडेला उतारात पलटी झाली. या बसमध्ये ५५ प्रवासी होते. त्यापैकी २० विद्यार्थी प्रवासी म्हणून गाडीत होते. गाडी मागे येऊ लागल्याने या विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी एकच आरडाओरड केली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून ही बस उंच टेकाडाऐवजी मोहेगाव फाट्याजवळ पायथ्याजवळूनच खोलगट भागात कोसळून पलटी झाली. अन्यथा, मोठ्या जीवितहानीची शक्यता होती. आज (२५) सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले तर १० प्रवाशांना बर्यापैकी मार लागलेला आहे. जखमींवर शासकीय रूग्णालयासह वेगवेगळ्या रूग्णालयांत उपचार करण्यात आलेत.
ही बस (क्रमांक एमएच ०६ एस ८३७५) मलकापूरहून राजूर घाटमार्गे बुलढाणाकडे जात होती. पावणे दहा वाजेच्या सुमारास तिने राजूरचा घाट चढण्यास सुरूवात केली. परंतु, पुढे जाण्याऐवजी ती मागे जाऊ लागली. बसचालक पवार यांनी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला असता, ब्रेकही लागत नसल्याने भयानक परिस्थिती निर्माण झाली. गोंधळलेल्या चालकाने शिताफीने बस खोलगट भागाकडे जाऊ दिली. तरीहीदेखील ती पलटी झाली. बसमध्ये असलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी व इतर प्रवासी हे जीवाच्या आकांताने ओरडत होते. बस पलटी होताच स्थानिक ग्रामस्थांनी व नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मदत व बचावकार्य सुरू केले. तसेच, या अपघाताची वाहक सौ. तायडे यांनी तातडीने आपल्या वरिष्ठांना माहिती दिली. पोलिस व ग्रामस्थांनी जखमींना तातडीने रूग्णवाहिका बोलावून बुलढाणा येथील शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. २० ते २५ प्रवासी जखमी झाले असले तरी त्यापैकी १० प्रवाशांना बराच मार लागलेला आहे. उर्वरित प्रवाशांची तपासणी करून त्यांना सुटी देण्यात आली होती. याबसमध्ये राजूर, मोताळा आणि तारखेड येथील विद्यार्थी होते. हे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी चांगलेच भेदरलेले होते. त्यापैकी काहीजण किरकोळ जखमी झालेले आहेत. अधिक तपास पोलिस करत आहेत.
————