बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – मागील काही दिवसांत जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. पंचनाम्याच्या कामी ज्या भागात अतिवृष्टी झालेली नाही, अशा ठिकाणचे मनुष्यबळ उपलब्ध करून कमी कालावधीत सर्व क्षेत्राचे पंचनामे करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दिले. जिल्हा नियोजन सभागृहात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष आणि गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे, आत्माचे प्रकल्प संचालक श्री. उन्हाळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रामुख्याने संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, मोताळा, मलकापूर या भागात घरे आणि शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र उर्वरित जिल्ह्यात पावसाचा फारसा प्रभाव नसल्याने याठिकाणचे मनुष्यबळ अतिवृष्टी झालेल्या भागात पंचनाम्याच्या कामी घेण्यात यावे. कर्मचार्यांच्या उपलब्धतेमुळे कमी कालावधीत जास्त क्षेत्राचे पंचनामे करणे शक्य होईल. पंचनाम्याच्या कामी अडचणी येत असल्यास नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करीत असताना येत्या खरीप हंगामात तृणधान्याच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. कृषि विभागातर्फे शेतकर्यांना करण्यात येणार्या मदतीने तृणधान्याखालील क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे येत्या रब्बीमध्ये जिल्ह्यात जादा तृणधान्य क्षेत्र लागवडीखाली येण्यासाठी शेतकर्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. जिल्ह्यात तृणधान्याचा प्रसारासाठी खरीप ज्वारी, खरीप बाजरी, राळा, कोदो, राजगिरा या पिकांचे एक लाख ७५ हजार मिनीकीट व क्रॉप कॅफेटेरियाचे विनामूल्य वाटप करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये जागृती होण्यासाठी दि. १ ते १४ ऑगस्ट दरम्यान अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच अंगणवाडीमधून तृणधान्याचा पोषण आहार देण्यासंदर्भात कार्यवाही करावी.
जिल्ह्यात एक लाख ८० हजार हेक्टरवर कपासाचे क्षेत्र आहे. कापसाच्या उत्पादनावर परिणाम करणारा सर्वात मोठा घटक हा गुलाबी बोंडअळी आहे. या बोंडअळीचे व्यवस्थापन आतापासूनच करण्यात यावे. फरदड पिक घेणे, जिनिंगमध्ये अळीचा प्रसारामुळे शेत पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव जाणवतो. त्यामुळे सध्याचे पिक फुलोर्यावर असताना अळीचा प्रादूर्भाव दिसत असल्यास फुले तोडावी. त्यामुळे अळीचे जीवनचक्र तोडण्यास मदत होईल. तसेच अळीवर प्रभावी ठरणार्या निंबोळी अर्काचा उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले.