Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

सातपुडा पर्वतरागांत ढगफुटी!; संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यांत हाहाकार!

– शेकडो घरे वाहून गेली, शेतीपिकांचे अतोनात नुकसान
– जळगाव जामोद – संग्रामपूर – शेगाव मार्ग बंद!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – शनिवारी पहाटे ५ वाजेपासून सातपुडा पर्वतरागांसह जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यांत ढगफुटीसदृश पावसाने नदी-नाल्यांना प्रचंड पूर आला असून, या पुरामुळे नदीकाठची घरे वाहून गेली तर अनेक घरात पाणी घुसले. नदीकाठची हजारो हेक्टर जमीन खरडून गेली. पूर्णा नदीला पूर आल्याने नांदुरा- जळगाव रस्ता बंद झाला आहे. संग्रामपूर तालुक्यातील एकलारा बानोदा येथील शेतकरी पुरात वाहून गेला असून, काथरगावसह काही गावातील वस्तीत पाणी शिरल्याने हाहाकार उडालेला आहे. मदतीसाठी जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाससह धुळ्याहून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. सर्व परिस्थितीवर संग्रामपूरचे तहसीलदार योगेश्वर टोंपे व जळगाव जामोदच्या तहसीलदार शीतल सोलाट हे लक्ष ठेवून आहेत.

संग्रामपूर तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट बनली असून, केदार नदीला महापूर आल्याने तालुक्यातील गावांमध्ये पाणी शिरले आहे. एक शेतकरीदेखील वाहून गेला असून, मदन घुले असे त्यांचे नाव आहे. पावसाचा जोर वाढतच असल्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत. तर जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव, सुनगाव, जामोद, वडगाव पाटण, इलोरा, निंभोरा, येनगाव, वडशिंगी, धानोरा, खेर्डा खुर्द व खेर्डा बुद्रुक आदी गावांमध्ये नदी नाल्यांचे पाणी घुसले. त्यामुळे घरांची फार मोठी हानी झाली. काही ठिकाणी जणू जलमय स्थिती निर्माण झाली होती. तब्बल पाच तास धुवाधार अखंड पाऊस सुरू होता. मुख्य जळगाव व जळगाव खुर्द या दोन नगरातून वाहणार्‍या पद्मावती नदीला प्रचंड पूर आल्याने भीमनगर, ताटीपुरा, तबिलपुरा, रुपलाल नगर, नाव्हीपुरा, तलावपुरा, माळी खेल आदी भाग हा जलमय झाला होता. या पद्मावती नदीकाठच्या दोन्ही भागातील घरे वाहून गेली आणि यामध्ये काही जनावरेसुद्धा मृत्युमुखी पडली. अचानक पूर आल्याने नागरिकांची मोठी धावपळ झाली. फक्त आपला जीव वाचविण्यापलीकडे त्यांच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता.
काल २१ जुलैपासून बुलढाणा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामध्ये घाटावरच्या तुलनेत घाटाखाली जास्त पाऊस पड़ते आहे. कालरात्री घाटाखाली संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात पावसाने तर हाहाकार उडविला. संग्रामपूर तालुक्यातील केदार नदीसह सर्वच नद्या व नाल्याचे पाणी शेतात शिरले असून, शेती जलमय झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. केदार नदीचे पाणी बावनबीर गावात घुसले असून, पुराच्या पाण्यात एकलारा बानोदा येथील शेतकरी वाहून गेल्याने खळबळ उडालेली आहे. काथरगाव येथील वस्तीत पाणी शिरल्याने ग्रामस्थ हादरलेले आहेत. तहसीलदार योगेश्वर टोंपे तेथे तळ ठोकून असून, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. संग्रामपूर तालुक्यातील संग्रामपूर, सोनाळा व बावनबीर महसूल मंड़ळात ६५ मिलीमीटरच्या वर पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद महसूल दरबारी झाली आहे.
जळगाव जामोद तालुक्यातही पावसाने हाहाकार उडविला असून, तालुक्यातील सर्वच नदी व नाल्याला पूर आलेले आहेत. त्यामुळे शेतीपिकांची अतोनात हानी झाली आहे. नदी नाल्यांना पूर असल्याने व पुलावरून पाणी वाहात असल्याने दोन्ही तालुक्यांचा इतर तालुक्यांशी संपर्क तुटला आहे. दरम्यान, मदत व बचाव कार्यासाठी दोन बोटींसह जिल्हास्तरीय शोध व बचाव पथक, तसेच धुळे येथून एनडीआरएफचे पथक दाखल झाले असल्याचे जिल्हा आपत्ती नियंत्रण विभागाकड़ून सांगण्यात आले. पाऊस व पुरामुळे मोठे नुकसान झाले असून, सगळीकड़े पाणीच पाणी असल्याने नुकसानीचा नेमका अंदाज आता तरी बांधता येणार नाही, पण आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे संग्रामपूरचे तहसीलदार योगेश्वर टोंपे व जळगाव जामोदच्या तहसीलदार शीतल सोलाट यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.

येत्या २७ जुलैपर्यत जिल्ह्यात असाच पाऊस राहणार असल्याचा हवामान विभागाच्या अंदाज आहे. मध्यप्रदेशात जास्त पाऊस पड़ला असून, त्याला लागूनच सातपुड़ा व संग्रामपूर, जळगाव जामोद तालुके आहेत. त्यामुळे त्याच प्रभावाने (रेन सॅड़ो) या तालुक्यांत पावसाचे प्रमाण जास्त आहे. तर येत्या ३ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पड़णार आहे.
मनेश येदुलवार, कृषी हवामान शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा

नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने १५० नागरिक अडकलेले आहेत. पुरातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. काही वेळातच पथक दाखल होणार आहे. पुरात अडकलेले सर्व नागरिक सुखरूप आहेत.
सुवर्णा गणेश टापरे, सरपंच, पिंप्री काथरगाव, ता. संग्रामपूर

श्रीसंत सखाराम महाराज संस्थान इलोरा येथेही पाणी घुसले असून, संस्थानचे मोठे नुकसान झाले आहे. संस्थानच्या अनेक वस्तू पुरामध्ये वाहून गेल्यात. गत पंचवीस वर्षाचा एवढा महापूर आम्ही बघितला नाही, अशी प्रतिक्रिया वयस्कर नागरिकांनी दिली. शनिवारच्या अतिवृष्टीने व महापुराने तालुक्यातील एकही गाव असे राहिले नाही की जे जलमय झाले नाही. नागरिक भयभीत झाले होते. आमदार डॉ. संजय कुटे हे त्वरित सर्व गावांना भेटी देण्याच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फिरत होते. त्यांनी सर्व नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. एकूणच नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर शासनाकडून योग्य ती मदत संबंधितांना दिल्या जाईल, असेही त्यांनी नागरिकांना आश्वस्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!