Breaking newsHead linesMaharashtraMarathwadaPolitical NewsPolitics

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त, नुकसानभरपाईसाठी सरकारला १५ दिवसांचा वेळ; अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कुत्रे, मांजरे, जनावरे सोडणार!

– भरमोर्चात वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा तुपकरांना फोन : बहुतांश मागण्या मान्य, आंदोलन मागे घेण्याची विनंती!

हिंगोली (गणेश मुंढे) – राज्यात वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचा वाढीव मोबदला द्यावा, तसेच शेतीला तार कुंपण लावण्याची योजना पंधरा दिवसात जाहीर करावी, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यामध्ये पाळीव प्राणी (कुत्रे-मांजरे) व जनावरे सोडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शुक्रवारी हिंगोली येथे दिला. दरम्यान, हिंगोलीच्या वनविभाग कार्यालयावर शेतकर्‍यांनी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढला. या मोर्चाच्या धास्तीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने तुपकर यांच्याशी संपर्क साधत, शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करत असल्याचे सांगितले.

शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या नैसर्गिक संकटांपैकी एक म्हणजे वन्यप्राण्यांकडून पिकाची होणारी नासधूस! उभ्या पिकात माकडं, कोल्हे, बिबटे, रोही, हरीण आणि असे अनेक वन्यप्राणी घुसून पिकाची प्रचंड नासधूस करतात. परंतु सरकार मात्र या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करत नाही, म्हणूनच आज हजारो शेतकर्‍यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आणि गोरेगाव ते हिंगोली असा २०० गाड्यांचा ताफा आणि पाच हजारांहून अधिक शेतकरी हिंगोली वनविभागाच्या दिशेने निघाले. मोठ्या पोलिस बंदोबस्तात हा मोर्चा ५ ते ६ किलोमीटरचे अंतर कापत हिंगोलीच्या वनविभाग कार्यालयावर धडकला. मागण्या मान्य करेपर्यंत तिथे हजारो शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन केले. अखेर शेतकर्‍यांच्या रुद्रावतारासमोर प्रशासनाला नमणे भाग पडले. स्वतः वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविकांत तुपकरांशी चर्चा करून मागण्या मान्य करत असल्याचे कळवले व ठिय्या आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
याप्रसंगी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले, की वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये शेतकरी व शेतमजुरांना जायबंदी व्हावे लागले आहे. तसेच शेतीपिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र शेतकर्‍यांना अल्प प्रमाणात मदत दिली जात असून ही मदतही वेळेत मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना वनविभागाकडे चकरा मारावे लागत आहेत. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी आजचा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा झाली आहे. त्यांनी शेतकर्‍यांना दुप्पट किंवा तिप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले. तसेच शेतकर्‍यांसाठी वैयक्तिक तसेच संपूर्ण गावाला तारकुंपण करण्याबाबतची योजनाही हाती घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र अधिवेशनानंतर आठ ते पंधरा दिवसात याबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती केली आहे. मात्र या मुदतीत निर्णय न घेतल्यास वर्षा बंगल्यामध्ये पाळीव प्राणी सोडणार असल्याचे त्यांना स्पष्ट केले. याशिवाय वनमंत्री मुनगंटीवार यांच्यासोबत होणार्‍या बैठकीमध्ये शासनाकडे काही मुद्दे देखील मांडले जाणार असल्याचे तुपकर यांनी स्पष्ट केले.

या मोर्चाचे यशस्वी आयोजन गजानन कावरखे व नामदेव पतंगे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यां केले होते. यावेळी दामूअण्णा इंगोले, हिंगोली बाजार समितीचे सभापती भैय्यासाहेब पाटील, पराग अडकीणे, मुनिर पठाण, मदनलाल कावरखे, भास्कर पाटील, गजानन सावंत, दशरथ मुळे, सतीश वैद्य, माधव वाघ, सखाराम भाकरे, सतीश माहोरकर, बालाजी मोरे, विशाल गोरे, सतीश इढोळे, गजानन पैठणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


हिंगोलीतील रेकॉर्डब्रेक मोर्चाला मोठे यश!

वन्यप्राण्यांमुळे शेती पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करावे व वन्यप्राण्यांमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई वाढवून मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जवळपास पाच हजार शेतकर्‍यांसह हिंगोलीत विराट मोर्चा काढला. त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी तुपकरांशी शेतकरी मागण्यांबाबत चर्चा केली. मंत्री मुनगंटीवार यांनी यावर पुढील १५ दिवसांत राज्य सरकार शेतीला कंपाऊंड करण्याच्या वैयक्तिक व गावपातळी वरील योजनेला मान्यता देणार आहे. तसेच वन्यप्राण्यांमुळे झालेल्या शेतीपिकांची नुकसान भरपाई दुप्पट किंवा तिप्पट करून ३० दिवसांच्याआत भरपाई देण्यासंदर्भात या अधिवेशनात कायदा पारीत करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच हिंगोली जिल्ह्यातील संवेदनशील गावांमध्ये तातडीने कंपाऊंड करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या मोर्चानंतर हिंगोली वनविभागाने वानरांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी आजच पथके रवाना केली होती. त्यामुळे बहुतांश मागण्या मान्य झाल्याने मोर्चा स्थगित केला जात असल्याचे रविकांत तुपकर यांनी जाहीर केले. जर येत्या १५ दिवसांत शेतीला कंपाऊंड करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला नाही व दिलेले आश्वासन पाळले नाही, तर राज्यभरातून हजारो शेतकरी बांधव आपली पाळीव जनावरे जसे की, गाई, म्हशी, कुत्रे, मांजरे मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर नेवून सोडतील, असा कडक इशारा यावेळी तुपकरांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!