Breaking newsHead linesKokanMaharashtraWorld update

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा २२ वर; आणखी १०७ ग्रामस्थ बेपत्ता!

रायगड (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील खालापूरमधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. इर्शाळवाडीत आज सकाळपासून सुरू असलेले बचाव आणि मदतकार्य रात्र झाल्याने व पाऊस सुरू असल्याने एनडीआरएफने थांबवले आहे. अद्याप १०७ नागरिक बेपत्ता असून, त्यांचा शोध लागू शकला नाही. तर ११९ ग्रामस्थांना वाचविण्यात यश आले आहे.

इर्शाळवाडी गावावर बुधवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास दरड कोसळली होती. यामध्ये इर्शाळवाडीतील अनेक घरे डोंगराखाली गाडली गेली होती. या घटनेची वर्दी मिळताच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि इतर यंत्रणा याठिकाणी तातडीने दाखल झाल्या होत्या. गुरुवारी पहाटेपासून एनडीआरएफच्या जवानांनी इर्शाळवाडीत मर्यादित साधनसामुग्रीसह ढिगारा उपसायला सुरुवात केली होती. काल रात्री अंधार पडल्यानंतर हे काम थांबवण्यात आले होते. तोपर्यंत १६ जणांचे मृतदेह आणि काही जखमींना बाहेर काढण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफ या यंत्रणांनी पुन्हा मातीचा ढिगारा उपसायच्या कामाला सुरुवात केली. डोंगर कोसळल्यामुळे याठिकाणी घरांवर जवळपास १५ ते २० फूट मातीचा ढिगारा जमा झाला होता. आज पहाटे ढिगारा उपसायला सुरुवात केल्यानंतर आतापर्यंत आणखी सहा मृतदेह हाती लागले आहेत. त्यामुळे आता इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. इर्शाळवाडी येथे अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे. खराब हवामानामुळे याठिकाणी अद्याप हेलिकॉप्टरच्या माध्यमातून यंत्रसामुग्री पोहोचवता येणे शक्य झालेले नाही. त्यामुळे एनडीआरएफच्या जवानांना मर्यादित साधनसामुग्रीसह हे काम करावे लागत आहे. काहीवेळापूर्वीच आजच्या दिवसाचे बचावकार्य थांबवण्यात आले आहे. उद्या पहाटे पुन्हा ढिगारा उपसण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे एनडीआरएफने सांगितले आहे.

दरम्यान, इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांचे तात्पुरत्या स्वरुपात येथील श्री मंदिर पंचायत सभागृहात स्थलांतर करण्यात आले आहे. तेथे त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जोपर्यंत त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी नागरिकांची सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यांच्या जेवणाची सोयही येथे करण्यात आली आहे.


मुख्यमंत्र्यांना सभागृहाला दिली दुर्घटनेची माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गुरुवारी इर्शाळवाडीला भेट दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज पावसाळी अधिवेशनावेळी सभागृहात या दुर्घटनेचा तपशील मांडला. यावेळी त्यांनी सांगितले की, इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली तेव्हा शाळेत झोपलेल्या मुलांना मोठा आवाज आला. ही मुले त्याठिकाणी गेल्यानंतर इतर लोक बाहेर आले. यानंतर एनडीआरएफचे पथक त्याठिकाणी तातडीने पोहोचल्यामुळे २० ते २५ लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळाले. इर्शाळवाडीतील १७ ते १८ घरांवर संपूर्ण डोंगरच कोसळला आहे, त्यामुळे ही घरे पूर्णपणे खाली गाडली गेली आहेत. या घरातील कोणते लोक बाहेर होते, त्यांचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ११९ जणांना वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


सप्तशृंगी गडवासीयांनाही इर्शाळवाडी दुर्घटनेची भीती

सप्तशृंगी गडावर माळीण आणि इर्शाळवाडीसारखी परिस्थती उद्भवू शकते, अशी भीती स्थानिकांना वाटत आहे. यामुळे ग्रामपंचायतीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लक्ष घालण्याच्या आवाहन केले आहे. ग्रामपंचायतीने थेट मुख्यमंत्री कार्यालय गाठल्याने प्रशासनाने तात्काळ बैठक बोलावून संभाव्य धोका आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सूचवल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसात डोंगररांगात राहणार्‍या नागरिकांना सर्वधिक धोका असतो. दरड कोसळणे, भूस्खलन होण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकाचा जीव टांगणीला लागलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!