BULDHANAHead linesVidharbhaWARDHA

समृद्धी महामार्गावरील ‘मृत्यूतांडव’प्रकरणी सरकारची आश्वासने ठरली वांझोटी!

– अपघात होऊन वीस दिवस उलटले तरी अद्याप ‘डीएनए’ रिपोर्टही प्राप्त नाही!

वर्धा/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा येथे समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता, या घटनेला आता वीस दिवस लोटले असतानादेखील डीएनए रिपोर्ट आला नाही. ट्रॅव्हल्स मालकावर गुन्हा दाखल झाला नाही, आणि मृतकांच्या कुटुंबातील लोकांना जाहीर करण्यात आलेली मदतदेखील मिळाली नाही, असे मुद्दे घेऊन वर्ध्यातील १४ मृतकांच्या कुटुंबीयांनी वर्ध्याच्या जिल्हाधिकार्‍यांची भेट घेत, तीव्र संताप व्यक्त केला आहे. यानिमित्ताने अपघातस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणा वांझोट्या ठरल्या आहेत. या भीषण अग्निकांडात हे सरकार कुणाला पाठीशी घालण्याचे काम करत आहे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

पिंपळखुटा येथील भीषण अग्निकांडात वर्धा जिल्ह्यातील १४ प्रवाशांचा अत्यंत दुर्देवी मृत्यू झाला होता. त्याच दिवशी बुलढाण्यात मृतदेहावर अंत्यसंस्कारदेखील पूर्ण व्हायचेच असताना दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ विस्तार करीत नव्या मंत्र्यांचा शपथविधी केला होता. सरकारच्या निष्ठूरतेचे आणखी एक उदाहरण चव्हाट्यावर आले असून, हा अपघात होऊन २० दिवस झाले तरीही सरकारला डीएनए अहवाल मिळाला नाही. कुटुंबातील व्यक्तींना अजूनही शासकीय मदत प्राप्त झाली नाही. मदत जाहीर होऊन २० दिवस उलटले तरीही ती मिळत नाही, त्यासाठी वाट का पाहावी लागते? अपघाताच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्यात आली पाहिजे, आज जर कारवाई झाली नाही तर ट्रॅव्हल्सचा हा अवैध धंदा अव्याहत सुरू राहील, असाही मुद्दा उपस्थित मृतांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बुलढाणा प्रशासनाला याबाबत अधिकृत विचारणा करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. ट्रॅव्हल्स अपघाताचा तपास थंड बस्त्यात का आहे, तपासात असणारी कागदपत्रे पीडित कुटुंबातील व्यक्तीला वेळोवेळी कामी पडणार आहे, पण ही कागदपत्रे मिळण्यासाठीदेखील त्रास होत आहे. इन्शुरन्स कंपनीकडून इन्शुरन्स मिळण्यासाठी त्याचा वापर होणार आहे. त्यासाठीदेखील नामांकित वकिलाची आवश्यकता आहे, शासनाने शासकीय वकील मिळवून द्यावा, अशी मागणी यासंदर्भात वर्धा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना मृतकांचे कुटुंबीय दिनकर खेलकर, ओमप्रकाश गांडोळे, शिवराज शिंदे, मदन वंजारी, रामदास पोकडे, सपना कामडी, चंद्रशेखर मडावी आदी उपस्थित होते.


विदर्भातून विदर्भ ट्रॅव्हल्सच्या गाड्या अजूनही धावत आहे. त्या तपासण्यात येत आहे की नाही? ज्या मालकाची ही ट्रॅव्हल होती तो वाहतूक विभागाचा अधिकारी आहे, त्यामुळे तर त्याच्यावर करवाई टाळली जात नाही ना? अशी शंका या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यापुढे मांडली. या अपघाताला विदर्भ ट्रॅव्हल्सच्या चालकासह मालकदेखील दोषी आहे. त्याबाबतची अनेक तथ्ये समोर आली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!