Breaking newsHead linesMaharashtra

दुबार पेरणीचे संकट आल्यास शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही!

– जलयुक्त शिवार टप्पा दोनमध्ये ५ हजार गावांचा समावेश
– पीएम किसान योजनेतील पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, यासाठी यंत्रणा राबवू
– कापसावर काही जागी लाल्यासदृश रोग, तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) – राज्यात कालपासून पावसाने पुन्हा एकदा सर्वदूर हजेरी लावली असून, कृषी विद्यापीठामधील तज्ञांच्या मते २२ जुलै किंवा ३१ जुलैपर्यंत ज्या पेरण्या होतील किंवा पूर्ण झालेल्या असतील. ते बियाणे न उगवल्याने किंवा अन्य कारणाने शेतकर्‍यावर दुबार पेरणीचे संकट आल्यास राज्य सरकार शेतकर्‍यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहील, व शेतकर्‍यांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देईल, असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेतील एका लक्षवेधीच्या प्रश्नावर बोलताना दिले आहे.

राज्यातील व विशेष करून मराठवाड्यात कमी पाऊस झाला असून, दुबार पेरणीचे संकट तसेच पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याच्या संभाव्य संकटाबाबत विधानसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठनेते हरिभाऊनाना बागडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या प्रश्नावर धनंजय मुंडे बोलत होते. या चर्चेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, बबनराव लोणीकर, राजेश टोपे, नारायण कुचे, विजय वडेट्टीवार, देवयानी फरांदे, कुणाल पाटील आदि सदस्यांनीही आपल्या भागातील प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, ग्रामीण भागात जी गावे जलयुक्त शिवार टप्पा-१ मध्ये घेण्यात आली नव्हती किंवा ज्या गावांत पाणलोटाची कामे झालेली नाहीत. अशा पाच हजार गावांचा जलयुक्त शिवार टप्पा-२ मध्ये समावेश करण्यात आला असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या वॉटरग्रीड प्रकल्प व जायकवाडीच्या पाण्याची तूट भरून काढण्याच्या मुद्द्यांवर बोलताना धनंजय मुंडे यांनी मराठवाड्याच्या दृष्टीने या दोन्ही बाजू अत्यंत आवश्यक असून, या संदर्भात जलसंपदा विभागाकडे स्वतंत्र बैठक लावण्याबाबत विनंती करणार असल्याचे सांगितले. पी.एम. किसान योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी के.वाय.सी. अपडेट करण्यापासून काही पात्र शेतकरी वंचित असल्याची बाब आ.नारायण कुचे यांनी उपस्थित केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी याबाबत बोलताना पी.एम. किसान योजनेतील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी गतीमान यंत्रणा राबविण्यात येईल, असेही सभागृहास आश्वस्त केले. धुळे जिल्ह्यास काही ठिकाणी नवीन उगवलेल्या कपाशीवर लाल्यासदृश रोग पडल्याच्या बर्‍याच तक्रारी शेतकरी, शेतकरी संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी कळवल्या आहेत. याबाबत कृषी व महसूल विभागास तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!