– वनविभाग, पीपल फॉर अनिमल्सची संयुक्त मोहीम
वर्धा (प्रकाश कथले) – महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठ परिसरातील जंगलात मागील तीन दिवसांपासून मुक्कामी असलेल्या बिबट्याला अखेर आज (दि.१९) दुपारी पावणेचार वाजच्यादरम्यान वनविभाग तसेच पीपल फॉर अनिमल्सच्या चमूने जेरबंद करण्यात यश मिळविले. सुमारे तीन तास बिबट्याचे जंगलात सर्च ऑपरेशन चालले. आपला पाठलाग होत असल्याचे पाहून बिबट सातत्याने जंगलातल्या झाडांतून पळत होता. अखेर तो आज दुपारी पावणेचार वाजताच्या दरम्यान नजरेच्या टप्प्यांत येताच त्याच्यावर बंदुकीतून बेशुद्ध करणारा डॉट मारण्यात आला. तो बेशुद्ध होत निपचित पडल्यानंतर त्याला जाळीत टाकून वैद्यकीय तपासणीकरीता वर्ध्याच्या करुणाश्रमात आणले गेले. त्याला कोठे ठेवायचे, याबाबतचा निर्णय वनविभाग घेणार आहे.
या परिसरातल्या जंगलात बिबट्याचा वावर असल्याचे तसेच तो दिसल्याचे सांगितले जात होते. हिंदी विद्यापीठात विविध राज्यातील तसेच विदेशातील विद्यार्थी हिंदीचे शिक्षण घ्यायला आले असल्याने त्यांच्या सुरक्षेची काळजी होतीच.त्यातच आज दुपारी साडेबारा वाजता तो काहींना दिसला होता. त्यानंतर वनविभाग,पोलिस तसेच पीपल फॉर अनिमल्सची चमू घटनास्थळी दाखल झाली होती. त्याचा विद्यापीठालगतच्या जंगलात शोध सुरू केला गेला. साडेतीन तासांच्या सर्च ऑपरेशननंतर तो पकडला गेला. आपला पाठलाग होत असल्याचे पाहून बिबट विद्यापीठ परिसरातील जंगलातल्या झाडांतून सारखा पळत होता तर वनविभागाची चमू, पीपल फॉर अनिमल्सचे आशीष गोस्वामी, त्यांचे सहकारी तसेच विद्यापीठातील सुरक्षा रक्षक त्याचा पाठलाग करीत त्याला जेरबंद करण्यास प्रयत्न करीत होते. बिबट बेशुद्ध होताच त्याला हिरव्या जाळीत टाकून रेस्क्यू व्हॅनद्वारे करुणाश्रमात आणले गेले. येथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पीपल फॉर अनिमल्सचे आशिष गोस्वामी यांनी सांगितले. नंतर त्याला कोठे ठेवायचे, याचाही निर्णय घेतला जाईल. यावेळी करुणाश्रमाचे आशीष गोस्वामी यांच्यासोबत कौस्तुभ गावंडे तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते.
या परिसरात सातत्याने बिबट वावरतो, त्यातच तो काही प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांना दिसल्यानंतर त्यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, दुपारी तीन वाजताच्या दरम्यान शाळा सुटण्याची वेळ असल्याने पालकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केले गेले होते. त्यानंतर या कोठे विरळ झाडे तर कोठे दाट झाडी असलेल्या जंगलात बिबट्याचा वनविभागाच्या चमूने शोध सुरू केला होता. अखेर त्याला पकडण्यात यश आल्याने नागरिकांसह हिदी विद्यापिठातील विद्यार्थी तसेच प्राध्यापकांनी सुटकेचा श्वास घेतला. मागील काही महिन्यांपूर्वी सावंगीच्या रुग्णालय परिसरात बिबट्या शिरला होता. त्या घटनेनंतर आज हिंदी विद्यापीठ परिसरातील जंगलात बिबट्या दिसला. हिंदी विद्यापीठाचा परिसर टेकड्यांसह जंगलाने व्यापलेला असल्याने येथे वन्यप्राण्याचा मुक्त संचाराला वाव मिळतो.तो लगतच्या जंगलातून शिरला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी हिंदी विद्यापीठातील सुरक्षा रक्षक राहुल पाटणकर, अमित भुरे, रवींद्र वानखेडे, राजू गुरुनुले, आशीष मांडवकर यांनी बंदोबस्त ठेवण्यास सहकार्य केले.
——