– आगामी निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असून, विदर्भ व मराठवाड्यातील २५ नवीन शहर व जिल्हाध्यक्ष नियुक्त केले आहेत. एरवी बुलढाण्यासाठी एकच जिल्हाध्यक्ष असताना आता रा. स्व. संघाच्या धर्तीवर घाटावर गणेश बाबुराव मांटे बुलढाणा आणि घाटाखाली खामगावसाठी सचिन पंजाबराव देशमुख यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तर राज्यातील इतरही जिल्हाध्यक्ष बदलले जाणार असल्याची माहिती आहे.
भाजपने आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समित्या, तसेच नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी चालवली आहे. कोणत्याही परिस्थितीत जिंकायचेच असा बेत आखल्याचे दिसत आहे. लोकसभा निवड़णुका सात ते आठ महिन्यावर येवून ठेपल्या असताना तयारी आधीपासूनच सुरू आहे. नवीन शिलेदार नेमल्याने कामाला आणखी गती येते व नवीन कार्यकर्याला संधी मिळते, हे हेरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विदर्भ व मराठवाड्यातील २५ नवीन शहर जिल्हाध्यक्ष नियुक्त केले आहेत. आणखी नियुक्त्या होणार असून, जवळजवळ ७० शहर व जिल्हाध्यक्ष नियुक्त केले जाणार असल्याची माहिती भाजप गोटातून मिळाली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी याअगोदर एकच जिल्हाध्यक्ष होता. पण संघाच्या एजेंड्यात दोन जिल्हे असल्याने त्याच धर्तीवर बुलढाणा व खामगाव असे विभाजन करून दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले गेले आहेत. यामध्ये घाटावर बुलढाण्यासाठी देऊळगावराजा येथील गणेश बाबूराव मांटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश मांटे यांनी याअगोदर सिंदखेड़राजा विधानसभेची निवड़णूक लढविली होती. घाटाखाली खामगावसाठी जळगाव जामोदचे सचिन पंजाबराव देशमुख यांची नियुक्ती करून तरूण चेहर्याला संधी दिली आहे. ते या अगोदर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष होते. मांटे व देशमुख यांच्या नियुक्तीने भाजपने जिल्ह्यात जातीय समिकरणदेखील साधले आहे. घाटावर वंजारी समाजाचा प्रभाव जास्त असल्याने वंजारी समाजाचा जिल्हाध्यक्ष दिला आहे. तर घाटाखाली मराठा समाजाचा जिल्हाध्यक्ष देण्यात आला आहे. त्यामुळे वंजारी व मराठा या आपल्या पारंपरिक मतदारांना आपल्याकडे राखण्याचा भाजपने प्रयत्न केल्याचे यातून दिसून येत आहे.
दरम्यान, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीसाठी जोमाने काम करणार असल्याचे सचिन देशमुख यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलतात सांगितले. तर गणेश मांटे यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. सचिन देशमुख यांचे वड़ील स्व. पंजाबराव देशमुख हे संघाचे निष्ठावान कार्यकर्ते तसेच काहीकाळ भाजपाचे जिल्हाध्यक्षदेखील होते. या दोघांच्या नियुक्त्यांव्यतिरिक्त नागपूर शहर बंटी कुकड़े, नागपूर ग्रामीण सुधाकर कोहळे, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, भंड़ारा प्रकाश बाळबुदे, गोंदिया अॅड़ येशुलाल उपराळे, गड़चिरोली प्रशांत वाघरे, चंद्रपूर शहर राहुल पावड़े, चंद्रपूर ग्रामीण हरिष शर्मा, अकोला शहर जयंत मसने, अकोला ग्रामीण किशोर मांगटे, वाशिम शाम बढे, अमरावती शहर प्रविण पोटे, अमरावती ग्रामीण ड़ॉ. अनिल बोंड़े, यवतमाळ तारेंद्र बोर्ड़े, पुसद महादेव सुपारे, नांदेड शहर दिलीप कुंदकुर्ते, नांदेड उत्तर जिल्हा सुधाकर भोयर, नांदेड दक्षिण संतुकराव हंबर्ड़े, परभणी शहर राजेश देशमुख, परभणी ग्रामीण संतोष मुरकुटे, हिंगोली फुला शिंदे, जालना ग्रामीण बद्रीनाथ पठारे (दानवे) व संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी शिरीष बोराळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणखी काही नियुक्त्याही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.