चिखली (तालुका प्रतिनिधी) – रमाई व पंतप्रधान घरकुलांसाठी वेळोवेळी अर्ज मागवूनदेखील प्रशासनाने लाभार्थ्यांना घरे दिली नाहीत. भरपावसाळ्यात लाभार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. अधिकारी या पावसाळ्यात घरी बसून गरमागरम भजे खात असताना गोरगरीब मायमाऊल्या आपल्या मेनकापडाने फाटक्या झोपड्यांत दिवस कंठत आहे. लाभार्थ्यांना घराचा प्रश्न तातडीने मार्गी लावला नाही तर टॉवरवर चढून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा चिखली तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष मनोज जाधव यांनी गटविकास अधिकारी (बीडीओ) यांना दिला आहे.
याबाबत बीडीओंना दिलेल्या निवेदनात नमूद आहे, की रमाई, प्रधानमंत्री आवास या योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. अगोदर लाभार्थ्यांना लाभ देताना एकाच वेळेत जेवढे लाभार्थी आहे त्यांना एकाच वेळेमध्ये संपूर्ण घरकुल मंजूर करून त्यांना लाभ मिळत असे, आणि आता शासनाने काही वेगळे नियम लादून गोरगरिबांची हेळसांड करण्याचे काम केले आहे. वेळोवेळी मागणी करूनसुद्धा प्रशासन जाणून बुजून या रास्त मागणीकडे दुर्लक्ष करत आहे, असे दिसून येते. अनेक कालावधीपासून मंजूर योजना यादीमध्ये नाव येऊन प्रस्ताव मागवण्यात आले. परंतु पहिले दोन पावसाळे जाऊन आता परत पावसाळा आला आणि गरिबांच्या घरांना मोठ मोठ्या भेगा पडल्या आहे. घरात पाणी शिरत आहे. तरीसुद्धा प्रशासन गप्पच आहे सरकार यावर निर्णय घ्यायला कमी पडत आहे. असे म्हणण्यास हरकत नाही. आता पावसाळ्याचे दिवस आहे. गरिबांनी कुठे राहायचे, कुठे जायचे, याचा पर्याय शासनाने द्यावा. जी योजना २०२३/२४ ला पूर्ण करण्याचे स्वप्न या झोपलेल्या सरकारने जनतेला दाखवले होते. ते पूर्ण करण्यास हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असे दिसून येते. आज रोजी पावसाळा सुरू झालेला आहे. काही लाभार्थ्याचे घरकुल अर्धवट राहिलेले आहे. त्यांनी कुठे जायचे. प्रशासन व अधिकारी या पावसाळ्यामध्ये त्यांच्या घरी बसून भजे तळून आहे तर गोरगरीब माय माऊली जनता फाटलेल्या मेन कापडाने आपला संसार वारा व पावसापासून वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. गेंड्याची कातडी ओढलेल्या प्रशासनाला जाणीव करून देण्यासाठी आणि लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घरे (आवास) योग्य वेळेत मिळण्यासाठी, आम्ही वेळोवेळी लोकशाही मार्गाने निवेदने, आंदोलने केले. परंतु याचा या झोपलेल्या सरकारवर काहीही परिणाम झालेला नाही. या उलट ज्यांचे घरकुल अर्धवट राहलेले आहे. त्यांचे आश्रू कोण पुसणार, त्यांचे दुःख कोण जाणणार, त्यांची भावना कोण समजणार? या कुंभकर्णी झोपलेल्या प्रशासनाला विनंती आहे की येत्या आठ दिवसांमध्ये सदर घरकुल लाभार्थ्यांचे प्रत्यक्ष स्थळपाहणी करून हा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा, टॉवरवर चढून लोकशाही मार्गाने उग्र आंदोलन छेडण्यात येईल. व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.