ChikhaliVidharbha

गर्भवती माता, नवजात बालकांसाठी लसीकरण शिबीर राबवा!

चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखली शहरातील गजानन नगर व आसपासच्या परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांसाठी कायमस्वरुपी मोफत लसीकरण शिबीर राबविण्यात यावे, अशी मागणी गजानन नगर भागातील नागरिक व महिलांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे. लसीकरणासाठी गर्भवती माता, स्तनदा माता यांचे अतोनात हाल होत असल्याची बाबही लेखी निवेदनाद्वारे आरोग्य अधिकारी यांना कळविण्यात आली आहे.

चिखली शहरातील गजानन नगर, पुंडलिक नगर, आनंदनगर या भागातील रहिवासी गर्भवती माता व नवजात बालकांना लसीकरणासाठी नगरपालिकेच्या कार्यालयातील आवारात असलेल्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यावे लागते. उपरोक्त भागातील नागरिकांना यामुळे त्रास सहन करावा लागतो. याशिवाय, आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो. त्यामुळे गजानन नगर व आसपासच्या परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांसाठी कायमस्वरुपी मोफत लसीकरण शिबीर सुरु करण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनात नमूद आहे, की नगरपालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य शिबिरामध्ये अनेकवेळा कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण न करताच परत यावे लागते. यासर्वामध्ये वेळ व पैशाचा अपव्यय होत असतांनाच आरोग्याबाबतदेखील हेळसांड होते. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी सप्ताहातून किमान दोन दिवस कायमस्वरुपी कॅम्प आयोजित करण्यात यावा. तसेच या कॅम्पसाठी सप्ताहातील ठरावीक दिवस निश्चित वेळ व ठिकाण निश्चीत करुन तशी जनजागृती करण्यात यावी. जेणेकरुन परिसरातील नागरिक याचा लाभ घेऊ शकतील, अशीदेखील मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या या गंभीर प्रश्नाबाबत तालुका आरोग्य अधिकारी काय निर्णय घेतात हे पहावे लागणार आहे.

या निवेदनावर संजय पवार, राजेश पाठक, पवन शिराळे, सुनिल गायकवाड, सचिन तांगडे, आशीष देशमुख, सौरभ गवई, अनुराग गायकवाड, तेजस वानखेडे, आदित्य इंगळे, हितेश जैस्वाल, प्रतिक मोरे, प्रदीप सुरडकर, अमोल शिंगणे, दत्ता सोळंकी, सागर सोळंकी, दीपक ठाकूर, सचिन उबरहंडे, राजरत्न धेवंदे, अनिल निकाळजे, अक्षय इंगळे, विठ्ठल ढाकेफळे, हर्षल दांडगे, ऋषी पोटे, ईशान डोंगरदिवे, सौरभ पवार, अजय डोंगरदिवे आदी नागरिकांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!