Head linesMarathwada

‘बुलढाणा अर्बन’मध्ये एक कोटींची अफरातफर!

– पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या रांगा; रोखपाल कुलकर्णी, शिपाई देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कळमनुरी येथील बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेत जवळपास एक कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शाखा व्यवस्थापक व रोखपालाने खातेदारांनी दिलेली रोकड खात्यात जमा न करता परस्पर लांबवत लाखोंचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी तीन आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. बँकेतून पैसे काढण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कळमनुरी शाखेमध्ये ग्राहकांनी बचत खात्यामध्ये ठेवण्यासाठी आणलेली रक्कम व्यवस्थापक आणि रोखपालाने खात्यात न टाकता परस्पर उचलून घेत हा अपहार केल्याचे दिसून येते. हा प्रकार १७ जुलै रोजी उघडकीस आला होता. त्यानंतर बँकेत आपण ठेवलेली रक्कम व्यवस्थित आहे का, त्याचबरोबर ती रक्कम बँकेतून काढून घेण्यासाठी ग्राहकांनी बँक परिसरामध्ये मोठी गर्दी केली आहे. याप्रकरणी रोखपाल गजानन कुलकर्णी व शिपाई अविनाश देशपांडे या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शाखा व्यवस्थापक वसंत घुगे व रोखपाल संजय भोयर हे दोघे फरार आहेत. येथील शाखेत कार्यरत असलेले तत्कालीन शाखा व्यवस्थापक वसंत घुगे व रोखपाल संजय भोयर, गजानन कुलकर्णी यांनी संगनमत करून खातेदारांच्या खात्यात अफरातफर करत परस्पर रक्कम उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, शाखा व्यवस्थापक वसंत घुगे यांची बदली औंढा नागनाथ येथे झाली. त्यानंतर शाखा व्यवस्थापक संदीप लोंढे व विभागीय व्यवस्थापक गजानन रहाटे येथे रुजू झाले. खात्यात कमी रक्कम असल्याचे दिसून आल्याने काही खातेदारांनी शाखाधिकार्‍यांना याबाबत विचारले. तपासणी अंती अनेक खात्यात रक्कम जमाच केली नसल्याचे उघडकीस आले. खातेदार रक्कम जमा करण्यासाठी आले असता स्लीपवर शिक्का, स्वाक्षरी दिली. परंतु, प्रत्यक्षात रक्कम त्यांच्या खात्यात जमाच केली नाही. अपहार झाल्याची माहिती मिळताच खातेदारांनी शाखेत एकच गर्दी केली. सर्वजण खाते तपासून घेत होते. यावेळी खात्यात रक्कम जमा नसल्याचे कळाल्याने अनेक खातेदार हताश झाले. हा अपहार तब्बल एक कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज आहे. अपहराच्या तपासणीसाठी सोसायटीचेच नांदेड येथील आठ कर्मचारी आले आहेत. बँकेतील या अपहारप्रकरणी आता कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये बुलढाणा को-ऑपरेटिव्ह बँकेचे विभागीय व्यवस्थापक यांच्या तक्रारीवरून तीन आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर, इतर दोन आरोपी फरार आहेत. या गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम अजून वाढण्याची शक्यता असून, बँकेच्या वतीने शाखेतील व्यवहाराचे ऑडिट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


अनेकांनी लोकांनी घाम गाळून केलेली कमाई या बँकेमध्ये ठेवली होती. या पैशाच्या भरवशावर शेतातील कामे मुलामुलींची लग्न त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे म्हणून वापरता येतील या उद्देशाने हे पैसे बँकेत जमा ठेवले होते. पण शाखा व्यवस्थापक रोखपाल त्याचबरोबर सहाय्यक शाखा व्यवस्थापक यांनी ग्राहकांच्या खात्यातून ही परस्पर रक्कम काढल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. अनेकांनी या पैशाच्या भरोशावर मुलींची लग्नसुद्धा ठरवल्याचे ग्राहक सांगत आहेत. या प्रकरणाचा तपास कळमनुरीचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात शालिनी गजभारे, गजानन होळकर प्रशांत शिंदे, नागोराव होडगीर, देविदास सूर्यवंशी, गुलाब जाधव हे कर्मचारी करत आहेत. रोखपाल गजानन कुलकर्णी व शिपाई अविनाश देशपांडे या दोघांची कसून चौकशी सुरू असून, त्यांना लवकरच अटक केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!