खामगाव/बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – इस्त्रोच्या चंद्रयान-३ मोहिमेत लागणार्या दोन सुट्या भागाची निर्मिती जिल्ह्यातील खामगाव औद्योगिक वसाहतीत झाली आहे. मोहिमेसाठी विकमशी फेब्रीक्स येथे थर्मल शिट आणि श्रद्धा रिफायनरी येथे स्टरलिंग सिल्व्हर ट्युबची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यात अत्युच्च्य दर्जाच्या साहित्याची निर्मिती केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी गितीका विकमशी, स्वर विकमशी, शेखर भोसले या उद्योजकांचा खामगाव येथे सत्कार केला.
चंद्रयान मोहिमेसाठी विकमशी फेब्रीक्स प्रायव्हेट लिमीटेड येथे तीन थर्मल शिल्डची निर्मिती करण्यात आली आहे. यानाच्या खालील भागात दोन आणि वरील भागात एक असे तीन थर्मल शिल्ड बसविण्यात आले आहे. हे थर्मल शिल्ड यानाचा मुख्य भागाला सुरक्षित ठेवण्याच्या कार्यासोबतच वेगवेगळ्या टप्प्यावर वापरण्यात येणार्या इंधनापासूनही सुरक्षितता देते. थर्मल शिल्डसोबतच कंपनीमध्ये उत्पादित होणार्या इतर उत्पादनाची माहिती संचालक स्वर विकमशी यांनी दिली. तसेच श्रद्धा रिफायनरी येथे स्टरलिंग सिल्व्हर ट्यूब तयार करण्यात आल्या आहे. या ट्यूब चांदीच्या बनविण्यात आल्या आहे. सर्वोत्कृष्ट धातूपासून या ट्यूब तयार करण्यात आल्या आहेत, अशी माहिती श्रद्धा रिफायनरीचे संचालक शेखर भोसले यांनी दिली. सुरवातीला जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी विकमशी फेब्रीक्सची पाहणी केली. याठिकाणी यंत्रसामुग्रीसह कच्चा माल ते उत्पादित होत असलेल्या शिटची माहिती घेतली. त्यानंतर गितीका विकमशी आणि स्वर विकमशी यांनी कंपनीमध्ये तयार करण्यात येणार्या विविध उत्पादनाची निर्मिती आणि निर्यातीबाबत माहिती दिली. खामगाव येथून संरक्षण दल, पेट्रोलियम कंपनी, बंदरे, वैद्यकीय क्षेत्रात विविध उत्पादनांचा पुरवठा होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी श्रद्धा रिफायनरीला भेट दिली. याठिकाणी निर्मिती झालेल्या सिल्व्हर ट्यूब आणि सिल्व्हर कोटींग स्वीचची माहिती संचालक शेखर भोसले यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी, चंद्रयान मोहिमेत जिल्ह्यातील उद्योजकांनी खारीचा वाटा उचलला असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. जिल्ह्यात आल्यानंतर जगात निर्यात होणारा पिअर साबून उत्पादित होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आता इस्त्रोसारख्या नामांकित संस्थेमध्ये महत्वाकांक्षी चंद्रयानाला लागणारी सामुग्रीची निर्मिती करण्यात आली आहे. ही बाब देशाची प्रतिमा उंचावणारी आहे. उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण सामुग्री तयार होत असल्यामुळे इतर उद्योगांनाही यापासून प्रेरणा मिळेल. उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन करणार्या उद्योगांच्या प्रशासन नेहमीच पाठीशी राहिल. येत्या काळातही गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी संपूर्ण सहकार्यासोबतच उद्योगांना येणार्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.