Breaking newsHead linesPolitical NewsPoliticsWorld update

मोदींविरोधात “इंडिया”; बेंगळुरूत विरोधकांची एकजूट!

– ११ नेत्यांची समन्वय समिती ठरविणार निवडणुकांची रणनीती
– पुढील बैठक मुंबईत, मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचाही जोरदार हल्ला

बेंगळुरू (विशेष राजकीय प्रतिनिधी) – देशातील लोकशाहीचे हुकूमशाहीत रूपांतर होण्यापूर्वी ती वाचविणे गरजेचे आहे. त्यामुळे आता यूपीए नाही तर इंडिया (इंडियन नॅशनल डेवलपमेंटल इन्क्लूसिव अलायंस)च्या नावाखाली एकत्रित येत देशातील मोदी सरकारविरोधात काँग्रेस, शिवसेनेसह तब्बल २६ राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकले आहे. मंगळवारी बेंगळुरू येथे पार पडलेल्या बैठकीत ही वङ्कामूठ आवळण्यात आली. या बैठकीबाबत बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे म्हणाले, की आम्हाला पंतप्रधानपद, सत्ता याचा मोह नाही. परंतु, लोकशाही वाचविणे गरजेचे आहे. म्हणून सर्व एकत्र आलो आहोत. ११ नेत्यांची समन्वय समिती पुढील निवडणुकांची रणनीती निश्चित करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील बैठक मुंबईत होणार असून, त्यात या समन्वय समितीतील नेत्यांची नावे व कार्यालय स्थापन्याबाबत तोपर्यंत निर्णय होईल, असेही खारगे म्हणालेत.

भाजपने लोकशाहीतील सर्व यंत्रणा जसे – ईडी, सीबीआय आदी नष्ट केल्या असून, देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. देशाला वाचविणे हे आज प्रत्येकाचे कर्तव्य असून, आमच्यात मतभेद असले तरी आम्ही लोकशाहीच्या बचावासाठी एकत्र आलो आहोत. पहिल्यांदा आम्ही जेव्हा पाटण्यात भेटलो तेव्हा १६ राजकीय पक्ष आमच्या सोबत आलेत. आज भेटलो तर २६ पक्ष आमच्यासोबत आहेत. यावेळी त्यांनी आजच नवी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीला टोला लागविताना ते (भाजप अध्यक्ष) म्हणतात की आमच्या बैठकीला ३६ पक्ष आले आहेत, परंतु त्यांच्या बैठकीला कोणते राजकीय पक्ष आलेत, त्यांची नावे सांगा, ते नोंदणीकृत आहेत की नाही, याचीही काही माहिती नाही, असा टोलाही त्यांना भाजप व एनडीएला लगावला. देशातील सर्व मीडियावर मोदीने कब्जा केला असून, यापूर्वी हा मीडिया आमच्याशी इतका पक्षपातीपूर्ण वागल्याचे आम्ही कधी अनुभवले नाही. त्यामुळे आपल्याला आता लोकांच्याच दारात जाऊन आपली भूमिका समजावून सांगावी लागेल, असेही खरगे याप्रसंगी म्हणालेत.

याप्रसंगी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. त्यांनी मोदी सरकारचे अक्षरशः वाभाडे काढले. त्यांना पराभूत करून या देशातील लोकशाही वाचविणे गरजेचे आहे. ते काम आपण केले नाही तर इतिहास आपल्याला क्षमा करणार नाही. शत्रू प्रबळ असला तरी त्याला हरविता येते. आपण परिवार म्हणून एकत्र येऊ, एकत्र लढू, असेही ठाकरे यांनी नीक्षून सांगितले. याप्रसंगी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची घणाघाती भाषणे झाली. आता इंडियाविरूद्ध मोदी हा संघर्ष होईल, आणि त्यात इंडिया जिंकेल, असे राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले. ज्येष्ठ नेते शरद पवार, लालूप्रसाद यादव यांची उपस्थिती याप्रसंगी लक्षवेधी ठरली होती.


विरोधी पक्षांच्या आजच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पत्रकारांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्तेत सहभागी आहे. मग त्यांना कसे विरोधकांच्या आघाडीत सामावून घेतले जात आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते पक्षाचे नेता आहे. लोकप्रिय आहेत. त्यांना कार्यकर्ते आणि नागरिकांचा पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे हेसुद्धा लोकप्रिय नेते आहेत. लोकं त्यांच्यासोबत आहेत. आमदार येतील किंवा जातील ते महत्त्वाचे नाही. पक्ष निर्माते इथे आहेत. दोघे पक्षनिर्माते आहेत. ते फायटर आहेत. त्यामुळे तु्म्ही काळजी करु नका. आम्ही एक आहोत. आमच्यात डिवीजन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, असे उत्तर मल्लिकार्जुन खरगे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!