Head linesNAGARPachhim Maharashtra

अंकुश चत्तर हत्येप्रकरणी नगरसेवक स्वप्नील शिंदेसह सात आरोपींच्या मुसक्या आवळल्या

– चितळे रोडवर काँग्रेसकडून सरकारविरोधात घोषणाबाजी, तीव्र निषेध

अहमदनगर (सोमनाथ शिंदे) – सावेडीतील नृशंस अशा अंकुश चत्तर (वय ३५, रा. पद्मानगर, सावेडी) यांच्या निर्घृण खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने भाजपचा नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह सात आरोपींच्या अखेर मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, दुपारी अंकुश यांच्या पार्थिवावर प्रचंड बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. या हत्याकांडामुळे शहरात तणावाचे वातावरण असून, अंत्यसंस्काराला प्रचंड गर्दी उसळली होती. एलसीबीने अटक केलेल्या आरोपींत भाजप नगरसेवक स्वप्नील रोहिदास शिंदे (वय ४०, रा. भिस्तबाग), महेश नारायण कुर्‍हे (वय २८, रा. साईनगर, वाघमळा, सावेडी), सूरज उर्फ विक्की राजन कांबळे (वय २५, रा. भुतकरवाडी), मिथून सुनील धोत्रे (वय २३, पवननगर) व एक अल्पवयीन आरोपी यांचा समावेश आहे. मृत्युमुखी पडलेले अंकुश चत्तर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते. आ. संग्राम जगताप यांनी या घटनेबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला असून, पोलिसांनी आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी चितळे रोड येथे रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध नोंदविला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले अंकुश चत्तर यांच्या अंत्ययात्रेला उसळलेली गर्दी.

मुलांचे झालेले भांडण सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले अंकुश चत्तर हे सावेडी भागात आले होते. त्यामुळे काळ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या सात ते आठ आरोपींना त्यांच्यावर लोखंडी रॉड, गावठी कट्टा, काचेच्या बाटल्या व वायररोप यांनी प्राणघातक हल्ला चढवून त्यांना धाराशयी पाडले होते. तसेच, परिसरातही प्रचंड दहशत निर्माण केली होती. यातील मुख्य आरोपी हा भाजपचा नगरसेवक असून, स्वप्नील शिंदे असे त्याचे नाव आहे. त्याने मारेकर्‍यांना चत्तर यांना जीवे ठार मारण्यासाठी उसकावले होते. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात भारतीय दंडविधानाच्या ३०७, ३२३, ३२४, ३२५, ३२६, १४३, १४७, १४८, १४९, १०८ या कलमांसह शस्त्रकायदा ३/२५ व मुंबई पोलिस कायदा ३७(१)(३)/१३५ कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. घटनेनंतर आरोपी हे पळून गेले होते. परंतु, स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. आज अंकुश चत्तर यांचा मृत्यू झाल्याने या गुन्ह्यांत पोलिसांनी ३०२ हे वाढीव कलमदेखील लावले आहे. पोलिस कसून तपास करत आहेत.


आरोपी विदर्भात पळाले; पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने शोधले!

आरोपींनी वापरलेली काळ्या रंगाची गाडी सीसीटीव्ही फुटेमध्ये कुठे गेली हे शोधले असता, ती नगर, शेवगाव, पैठण, बीडकिनमार्गे वाशिमकडे जाताना दिसली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गाडीचा पाठलाग केला असता, ती वाशिम येथील हॉटेल गुलाटीच्या बाहेर आढळून आली. कारमधील आरोपी हे याच हॉटेलमध्ये थांबलेले होते. पोलिसांनी नगरसेवक स्वप्नील शिंदे, अक्षय हाके, अभिजीत बुलाख, महेश कुर्‍हे, सूरज कांबळे यांना येथून जेरबंद केले तर रांजणी बेल्हे (जुन्नर) येथून मिथून धोत्रे व एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!