मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – तालुक्यातील मेरा बुद्रूक येथील मुस्लीम कुटुंबातील १० व्यक्तींना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांना बुलढाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या तो रुग्ण अतिदक्षता दक्षता विभागात उपचार घेत आहे.
सविस्तर असे की, १५ जुलैरोजी या मुस्लीम कुटुंबातील सर्वांनी जेवण केल्यानंतर अनेकांना उलटी, जुलाब, मळमळ, चक्कर असा त्रात एकाचवेळी सुरू झाला. त्यामुळे त्यांना गावातील खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरने बुलढाणा येथे सामान्य रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. घटनेचे गांभीर्य व समयसूचकता दाखवत ताबडतोब बुलढाणा येथे पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. सर्व कुटुंब आज रोजी जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे उपचार घेत आहे. त्यामध्ये शेख आलम शेख खासाब, कलीम खा आलम खा, जुलेखा बी शेख आलम, शेख रज्जाक शेख सादिक, बाशिराबी शेख मुस्तफा, तयराबी शे मुस्तफा, शेख मुस्तफा शेख हुसेन, रुबीना शेख आलम, हुजेराबी जुले खा खासब, शबाना बी शेख सादिक यांचा समावेश आहे.
या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गजानन वायाळ यांनी स्वतः जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस करून त्यांना मानसिक धीर दिला व रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांना फोन केला. डॉ.भुसारी यांना समयसूचकता दाखवत सर्व रुग्णांच्या सेवेसाठी वैयक्तिक फोन करून योग्य प्रकारचे तातडीचे उपचार करण्यात सांगितले. सामान्य रुग्णालयातील अनेक रुग्णांना भेटी देऊन त्यांची वैयक्तिक विचारपूस केली. मेरा बुद्रुक येथील गरीब कुटुंबातील एकाच कुटुंबातील १० व्यक्ती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असताना त्या ठिकाणी कोणताही लोकप्रतिनिधी गेला नव्हता. परंतु, वायाळ यांनी धाव घेतली. तसेच, गरीब मुस्लीम कुटुंबीयांना चांगल्या प्रकारची वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भुसारी यांचे आभार मानले.