Breaking newsHead linesMaharashtraMumbaiPolitical NewsPoliticsWorld update

बंडखोर नेते शरद पवारांच्या भेटीला; पाय पकडले, आशीर्वाद मागितले; पवार एक शब्दही बोलले नाही!

– शरद पवारांनी अजितदादा गटाचा प्रस्ताव फेटाळला : भाजपसोबत जाणे नाही, संघर्ष करू!

मुंबई (प्राची कुलकर्णी) – विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची रणनीती ठरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांची बैठक बोलावली असताना, पक्षाची बंडखोर नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व इतर मंत्री, आमदारांनीदेखील यशवंतराव चव्हाण सेंटर गाठत पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी अजितदादांसह सर्व मंत्र्यांनी पवारांची पाय पकडून त्यांचे आशीर्वाद मागितले. आजच्या राजकीय परिस्थितीत भाजपसोबत जाणे कसे गरजेचे आहे, आणि आमची भूमिका कशी बरोबर आहे, हे अजितदादांनी पवारांना पटवून सांगितले. मंत्री छगन भुजबळ यांनी तर पाय पकडून सांभाळून घ्या, अशी विनवणी केली. परंतु, शरद पवार हे शांत बसून होते. या नेत्यांना ते एक शब्दही बोलले नाहीत. जवळपास पाऊण तास चर्चा झाल्यानंतर हे सर्व नेते बाहेर पडले. या भेटीबाबत बोलताना अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ रहावा, तसेच तो मजबुतीने पुढे जावा, याबाबत आपण विचार करावा. तसेच आम्ही त्यांचे पाय पकडून आशीर्वाद मागितलेत, असे पटेल यांनी सांगितले. तर या भेटीनंतर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की पुरोगामी विचार पुढे न्यायचे असून, आम्हाला भाजपसोबत न जाता त्यांच्याविरोधात संघर्ष करायचा आहे, असे पवारांनी स्पष्ट केले.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी बंडखोर नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री तथा ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, हसन मुश्रिफ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे, आदिती तटकरे, धनंजय मुंडे आदी अचानक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पोहोचले. तेथे शरद पवार हे आपल्या समर्थक आमदार व नेत्यांची बैठक घेत होते. अजितदादा व मंत्री आल्यानंतर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा खा. सुप्रिया सुळे यांनी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील व विधीमंडळ गटनेते आ. जितेंद्र आव्हाड यांनीदेखील बोलावून घेतले. भाजपसोबत सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर बंडखोर नेत्यांची पक्षाध्यक्षांसोबत ही पहिलीच बैठक होती.  ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी थेट पवारांचे पाय धरत विठ्ठला सांभाळून घे रे आम्हाला, अशी विनवणी केली.  त्यानंतर सर्वच नेते पवारांच्या पाया पडले.  या बैठकीबाबत माहिती देताना खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले, की आम्ही पवारसाहेबांचे पाय पकडून आशीर्वाद घेतले. आम्ही त्यांना विनंती केली की, पक्ष एकसंघ रहावा. तसेच, मजबुतीने पुढे जावा, यासाठी आपण आमच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा. आमचे म्हणणे त्यांनी शांतपणे ऐकून घेतले परंतु काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर आम्ही तेथून बाहेर पडलो, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी १४ जुलैरोजी अजित पवार यांनी सिल्वर ओकवर जात शरद पवार व काकू प्रतिभाकाकी पवार यांची भेट घेतली होती. प्रतिभाकाकींच्या हाताचे छोटेसे ऑपरेशन झाले असल्याने अजितदादा त्यांच्या आईसमान काकूला भेटण्यासाठी आवर्जुन गेले होते. बंडखोर नेत्यांच्या या भेटीनंतर शरद पवार पुढे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी गेले. तिथे मात्र त्यांनी भूमिका स्पष्ट केली. पवार म्हणाले, की पुरोगामी भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. मला भाजपसोबत जायचें नसून आपल्याला संघर्ष करायरचा आहे, असे सांगत शरद पवार यांनी अजित पवार गटाचा पुन्हा एकत्र येण्याचा प्रस्ताव फेटाळला असल्याचे स्पष्ट केले.

———
आज आमचे दैवत शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांच्यासह हे सर्व नेते वाय. बी. चव्हाण सेंटरला वेळ न मागता संधी साधून आलो. आम्ही शरद पवारांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद मागितले आणि त्यांना विनंतीदेखील केली. आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहेच, तसेच राष्ट्रवादी पक्ष एकसंध कसा राहू शकतो, याबद्दल त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करावे, असी विनंतीदेखील केली. यावर शरद पवारांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी शांतपणे सगळे ऐकून घेतले, असे बंडखोर नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये झालेल्या बैठकीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ‘ही भेट झाल्याची मला कल्पना नाही, पण भेट घेतली तर त्यात काही वावगं आहे, असे मला वाटत नाही. वर्षानुवर्षे शरद पवार साहेब त्यांचे नेते आहेत. नवीन काही राजकीय समीकरण होईल, असे मला वाटत नाही,’ असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!