Head linesMaharashtraMumbaiPolitical NewsPolitics

उद्यापासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

– मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार!
– विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, यशोमती ठाकूर यांची नावे चर्चेत

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या (दि.१७) पासून मुंबईत सुरु होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेले बंड, बदलती राजकीय समीकरणे, विधान परिषदेत झालेले पुरेसे संख्याबळ यामुळे या अधिवेशनात सत्ताधारी पक्ष आश्वस्त आहे, तर शिंदे सरकारला आता दोनशेहून अधिक आमदारांचे पाठबळ लाभले आहे. विरोधी बाकांवर काँग्रेसचे ४४ तसेच ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असलेले एकत्रित ३० च्या आसपास आमदार असतील. या अधिवेशनात विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला असून, त्यासाठी सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे या नावांची सध्या काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी आज सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालत, सरकारला धारेवर धरण्याचे संकेत दिलेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि नीलम गोर्‍हे यांचा शिंदे गटात प्रवेश यामुळे सत्ताधार्‍यांसाठी विधानपरिषदेत विधेयके मंजूर करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. विधानपरिषदेच्या २१ जागा रिक्त आहेत. तर ५७ सदस्यांच्या सभागृहात भाजप आणि मित्र पक्षांचे संख्याबळ ३० पर्यंत गेले आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागा नेमण्यावरील स्थगिती आता उठली असल्याने, सभापती पदाची निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे. उद्या सुरु होणार्‍या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चहापान आयोजित केले होते. परंतु, या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. दुपारी महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर, त्या बैठकीत अधिवेशनाची रणनीती निश्चित करण्यात आली.

दरम्यान, काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात म्हणाले, की विरोधी पक्षनेते पदासंदर्भात आम्ही दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहोत. उद्याच्या अधिवेशनात महत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही बोलणार आहोत. राष्ट्रवादीशिवाय पत्रकार परिषद झाली असे म्हणता येणार नाही, एकनाथ खडसे सहभागी होते. राष्ट्रवादीतल्या भेटीगाठी आम्हीही पाहिल्या, प्रफुल पटेल यांची प्रतिक्रियाही पाहिली पण मी त्यावर जास्त काही भाष्य करणार नाही, त्यांच्या पक्षातील लोकांनी यावर बोलावे. महिला अत्याचार, शेतकरी अडचण, दंगली आणि अनेक प्रश्न आहेत जे अधिवेशनात आम्ही मांडणार आहोत. हायकमांड विरोधी पक्षनेत्यावर निर्णय घेतला जाईल, असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!