– वॉटरप्रूफ मंडप टाकणे सुरू; भोजन, पाणी व निवासाचीही उत्तम सोय!
बिबी (ऋषी दंदाले) – विदर्भाची पंढरी मानल्या जाणार्या शेगाव येथील संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहून परतीच्या मार्गाने येत असताना विदर्भातील दुसरा मुक्काम १७ जुलै रोजी बिबी येथे होणार आहे. परिसरातील भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बिबी ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. तसेच, या पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी ग्रामस्थांनी केली आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गजानन महाराज पालखीमधील वारकरी भक्तांची गैरसोय होणार नाही, यासाठी ग्रामस्थांनी वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था केली आहे, तर पालखी मार्गाची स्वच्छता करून रस्त्याच्या कडेला पाणी साचलेल्या ठिकाणी मुरूम टाकून रस्ता व्यवस्थित करण्यात आला आहे. तसेच महाराजांच्या मुखवट्याचे दर्शन महिला, पुरुष यांना शांततेत घेता येईल, अशा प्रकारे दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली असून, भक्त वारकर्यांची भोजनाची व रात्रीच्या झोपण्याची तसेच सकाळच्या आंघोळीची उत्तम व्यवस्था वसंतराव नाईक महाविद्यालयात सर्व सोयीसुविधा युक्त करण्यात आली आहे. तसेच, डॉक्टर असोसिएशन बिबी यांच्या सौजन्याने पायी चालून थकलेल्या वारकर्यांच्या पायाची मालिश आयुर्वेद तेलाने करून देण्याची सेवासुद्धा गोपाल खंडागळे (आयुर्वेदाचार्य) पारायणी नाडी वैद्य व त्यांचे सहकारी हे करणार आहेत. वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आली असून, बिबी परिसरातील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे बिबी ग्रामस्थांकडून आवाहन करण्यात आले आहे.
पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी बिबी ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, येथील तरुण मुले, विविध ग्रूप, मंडळे, महिला वारकरी ग्रुप, वडीलधारी मंडळी, भजनी मंडळी यांनी पुढाकार घेतला असून, बिबी – किनगाव जट्टू पालखीमार्गाचे रखडलेले कामही पलसिद्ध कंट्रक्शनने युद्ध पातळीवर करून पालखीसाठी मार्ग सुकर करून दिला. त्यामुळे पालखीतील वारकर्यांना मोकळा प्रवास करता येणार असून, होणार्या गर्दीपासून सुटका मिळाली आहे.