शरद पवार यांच्या पत्नी ‘प्रतिभाकाकी’ रूग्णालयात दाखल
UPDATE : अर्थ खातं मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. अजित पवारांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबई (खास प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व देशातील महत्वपूर्ण नेते खा. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई (काकी) पवार यांना आज तातडीने मुंबईतील ब्रीच कॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या हातावर आजच शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शरद पवार हेदेखील ब्रीच कॅण्डीमध्ये दाखल झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ‘काकी’ यांचे अतिशय लाडके पुतणे अजितदादा पवार यांच्या बंडामुळे प्रतिभाकाकी या खचल्या होत्या, त्यामुळेच त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले, अशी चर्चा होती. परंतु, तसे काही नसून हाताच्या आजारामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जात असल्याचे त्यांच्या निकटर्तीय सूत्राने सांगितले आहे. दरम्यान, अजितदादादेखील आपल्या काकीला भेटण्यासाठी येण्याची शक्यता वर्तविली गेली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारण आणि जडणघडणीत बारामतीच्या पवार कुटुंबीयांचा मोठा वाटा आणि भूमिका नेहमीच राहिली आहे. पाठीमागील अनेक दशके महाराष्ट्राचे राजकारण पवार कुटुंबीयांच्या भोवती फिरते आहे. शरद पवार हे राज्य आणि देशाच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी असतात. असे असले तरी प्रतिभाकाकी पवार यांनी मात्र केव्हाही राजकीय महत्त्वाकांक्षा दाखवली नाही. इतकेच नव्हे तर राजकीय कार्यक्रमांनाही त्या फारशा उपस्थित नसतात. अपवादात्मक स्थितीमध्ये त्या शरद पवार यांच्यासोबत किंवा स्वतंत्रपणे केव्हातरीच त्या अशा कार्यक्रमांना उपस्थित राहतात. मितभाषी स्वभाव आणि कामातील नीटनेटकेपणा ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘काकी’ या नावाने ओळखल्या जाणार्या प्रतिभाताई पवार यांनी सर्व नेते व कार्यकर्ते यांना आईच्या मायेने सांभाळले आहे. अजितदादा पवार यांना तर त्यांनी मुलगाच माणून आईचे प्रेम दिले. शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांचा विवाह १९६७ मध्ये झाला. त्यांची मुलगी सुप्रिया सुळे या महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघातून लोकसभा खासदार आहेत. प्रतिभाकाकींचे वडील सदाशिव शिंदे हे भारतीय क्रिकेट संघात फिरकीपटू होते. त्यांनी १९४६ ते १९५२ दरम्यान सात कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर पुन्हा एकदा नव्या दमाने पक्ष बांधण्यासाठी आणि पक्षात सुरु असलेली पडझड थोपवण्यासाठी स्वत: शरद पवार, खा. सुप्रिया सुळे आणि आ. रोहित पवार हे राज्यात जंगजंग फिरुन कार्यकर्त्यांना आपली भूमिका समजावून सांगत आहेत. त्यातच शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार वगळता पवार कुटुंबीयांतील कोणीही अजित पवार यांच्या राजकीय निर्णयावर भाष्य केलेले नाही. यादरम्यान पुन्हा एकदा या वयात शरद पवार यांचे पावसात भिजल्याचे फोटो पाहून प्रतिभाताई पवार या काळजीने त्रस्त झाल्या आहेत. त्या काळजीपोटीच त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात आहे. तथापि, त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया केली जाणार असून, त्यांना लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना नेते व कार्यकर्ते करत आहेत.
—————