Breaking newsHead linesMaharashtraMumbaiPolitical NewsPolitics

राज्य सरकारच्या तिजोरीच्या चाव्या अजितदादांच्या हाती; वादग्रस्त सत्तारांचे कृषी खाते काढले!

UPDATE : अर्थ खातं मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. अजित पवारांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.


– मंत्रिमंडळ विस्ताराचे घोंगडे अद्यापही भीजत पडलेले!

मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे नवे खातेवाटप अखेर झाले असून, अजितदादा पवार गटाला क्रीम खाती मिळाली आहे. विशेष म्हणजे, स्वतः अजितदादांना हवे असलेले अर्थमंत्रालय मिळाले असून, राज्य सरकारच्या तिजोरीच्या चाव्या दादांनी हाती घेतल्या आहेत. तर वादग्रस्त ठरलेले मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषी खाते काढून घेण्यात आले असून, ते धनंजय मुंडे यांना देण्यात आले आहे. सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हे खातेवाटप जाहीर केले. खातेवाटप आणि खात्यांमध्ये फेरबदलाला राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिली आहे. खातेवाटप झाले असले तरी, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याबाबत मात्र काहीही निश्चिती होत नसल्याने शिंदे गटाचे आमदार नाराज आहेत.

अजित पवार गटाने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतल्यानंतर तब्बल १३ दिवस त्यांचे नऊ मंत्री हे बिनखात्याचे मंत्री होते. तर अजित पवार यांना अर्थखाते देण्यास शिंदे गटाच्या आमदारांचा विरोध होता. मंत्रिमंडळ विस्तार झाल्याशिवाय खातेवाटप होऊ नये, अशीही यातील काही आमदारांची मागणी होती. या बहुचर्चित खातेवाटपात वादग्रस्त ठरलेले मंत्री अब्दुल सत्तार यांना सर्वात मोठा झटका बसला आहे. त्यांच्याकडील कृषी हे महत्वाचे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे आले आहे, तर सत्तार यांना अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्रालयाची जबाबदारी सोपण्यात आली आहे. खातेवाटपानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन यासह इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेल्या खात्यांची जबाबदारी आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते असून, यासोबतच विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खात्याची धुरा सोपावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या खातेवाटपात मंत्री संजय राठोड व अतुल सावे यांनादेखील झटका बसला आहे. राठोड यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन हे खाते होते. पण त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. अखेर त्यांच्या हातूनदेखील हे खाते निसटले आहे. संजय राठोड यांना आता मृदा व जलसंधारण खाते देण्यात आले. तर मंत्री अतुल सावे यांच्याकडून सहकार खाते काढून घेण्यात आले असून, सावे यांना गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची जबाबदारी मिळाली आहे.


– अजित पवार गटाच्या मंत्र्यांची यादी –
अजित पवार – उपमुख्यमंत्री, अर्थ व नियोजन
धनंजय मुंडे – कृषी
दिलीप वळसे-पाटील – सहकार
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा
आदिती तटकरे – महिला व बाल कल्याण
अनिल पाटील – मदत व पुनवर्सन
हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
संजय बनसोडे – क्रीडा
धर्मराव आत्रम – अन्न व औषध प्रशासन
– इतर मंत्र्यांची यादी –
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
चंद्रकांतदादा पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार गावित – आदिवासी विकास
गिरीष महाजन – ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी भुसे – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय राठोड – मृद व जलसंधारण
सुरेशभाऊ खाडे – कामगार
संदीपान भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय सामंत- उद्योग
प्रा.तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा
अतुल सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता


गेल्या वर्षभरापासून आपण मंत्री होणार अशी आशा लावून बसलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना, त्यांना लक्षातही येऊ न देता, राष्ट्रवादीने शह दिल्याचे या खातेवाटपातून दिसून आले आहे. राज्य सरकारकडे बहुमत असतानाही अजित पवारांच्या गटाने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. नुसता निर्णयच घेतला नाही तर जागेवरच मंत्रिपदाचा शपथविधीही कार्यक्रम पार पाडला. महाविकास आघाडीमध्ये असताना अजित पवारांच्या अर्थखात्याने शिवसेनेला निधी दिला नाही, अशी तक्रार करत शिवसेनेच्या ५० आमदारांनी सवतासुभा मांडला आणि भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यातून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले पण त्या व्यतिरिक्त त्यांच्या इतर सहकार्‍यांना मात्र म्हणावी तितकी चांगली खाती मिळाली नसल्याची चर्चा होती. आता ज्या कारणावरून शिंदे गटाने अजित पवारांवर टीका केली, तेच अर्थ खाते पवारांकडे आल्याने शिंदे गटाची मोठी राजकीय गोची झाली आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!