वर्धा (प्रकाश कथले) – वंचितांची वेदनेची वाचा गरिबीच्या शापात हरविली जाते, तेव्हा काय घडू शकते, याचे मन विदीर्ण करणारे प्रत्यंतर वर्धा जिल्ह्यातील दरिद्रीनारायणाच्या सेवेकरीता लढा देणार्या गांधीजींच्या सेवाग्राम येथील `आदर्श`नगरात आले. मानसिक आजाराने ग्रस्त ३८ वर्षीय मुलीवर उपचारानंतरही यश आले नाही. यातच तिचा ३ जुलै रोजी मृत्यू झाला. जेमतेमच काय पण गरिबीचा शाप एकाकीपणे भोगत असलेल्या वडिलांनी मुलीच्या अंत्यसंस्काराकरीता पैसेच नसल्याने मुलाच्या मदतीने घरातच खड्डा खोदून त्यात मुलीचा मृतदेह पुरला. त्या खड्ड्यावरच पाट्या टाकून वडील झोपायचे. पण या घटनेला वाचा फुटली. पोलिसांनी पंचनामा केला, असा सगळा शासकीय सोपस्कार घडला. पण जे घडले, त्यातून समाजमन हेलावलेच. घटनेच्या १० दिवसांनंतर काळजाला घरे पाडणारी ही घटना उघडकीस आली.
पोलिसांनी वडील साहेबराव भस्मे, त्यांची पत्नी तसेच मुलगा प्रशांत भस्मे, यांना ताब्यात घेतले आहे. सेवाग्रामच्या आदर्शनगरात साहेबराव भस्मे, त्यांची पत्नी, मुलगा प्रशांत (वय ३८) आणि मुलगी प्रणिता (वय ३७) राहायची. काहींच्या म्हणण्यानुसार हे अख्खे कुटुंबच मानसिकदृष्ट्या आजारी आहे. ते कोणाच्याही फारशा संपर्कात राहात नव्हते. कधी कधी या घरातून ओरडण्याचा आवाज यायचा. जिल्ह्यात येवढ्या सेवाभावी संस्था आहेत, त्यांच्यापैकी कोणालाच या कुटुंबाची माहिती कशी मिळाली नाही, हा प्रश्न निर्माण होतोच. याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रविणा मागील मानसिक आजाराने त्रस्त होती. ती वेडसर वृत्तीची असल्याने घराबाहेर कुठेही फारशी फिरत नव्हती. अशातच तिची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात उपचार करून घरी आणले होते. पण ३ जुलै रोजी रात्री सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास प्रविणाचा घरीच मृत्यू झाला. आता अंत्यसंस्कार कोण करणार, अंत्यसंस्काराकरीता पैसे कोठून आणणार, असे अनेक प्रश्न कुटुंबियांसमोर उभे झाले. रात्रभर विचार करुन दुसर्या दिवशी ४ जुलै रोजी सकाळी ७ वाजता वडिलांनी मुलाच्या मदतीने घरातच पलंगाजवळ खड्डा करून त्यात मुलीचा मृतदेह पुरला. त्यावर विटा अंथरल्या नंतर त्यावरच पाट्या टाकून वडील झोपत असे. वडिल साहेबराव भस्मे यांनीच ही धक्कादायक कबुली दिली.
आठवड्यापासून प्रणीता घराबाहेर न दिसल्याने शेजार्यांना संशय आला आणि त्यांनी याबाबतची माहिती शेजार्यांनी सेवाग्राम पोलिसांना दिली. त्यानंतर सेवाग्राम पोलिसांतील अधिकारी, कर्मचारी या आदर्शनगरातील घरी पोहोचले. त्यावेळी त्यांना घरातच खड्डा खोदल्याचे दिसले. पोलिसांनी याबाबत वडील साहेबराव तसेच त्यांचा मुलगा प्रशांत याला प्रविणाबाबत विचारणा केली असता, त्यांनी ती मरण पावल्यानंतर तिचा मृतदेह घरातच खड्डा खोदून पुरल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ तहसीलदारांना बोलावून घेतले. खड्डा खोदण्यात आला, त्यात प्रविणाचा कुजलेला मृतदेह मिऴाला. मृतदेह शवचिकित्सेकरीता नेणे शक्य नसल्याने जागीच शवचिकित्सा केल्यानंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गरिबीचा शाप मनोरुग्ण तर घडवितोच पण त्यातून पुढली वाटचालही किती भीषण होते, हेच यातून स्पष्ट झाले.