Breaking newsBULDHANACrimeHead linesVidharbhaWomen's World

तरूणीवरील सामूहिक बलात्काराने बुलढाणा हादरले! ८ नराधमांनी चाकूच्या धाकावर आळीपाळीने केला बलात्कार!

News Update : तरूणी म्हणते, बलात्कार झाला नाही, वैद्यकीय तपासणीसही दिला नकार! तरूणी दबावात असण्याची शक्यता!

दरम्यान, राजूर घाटातील सामूहिक बलात्कारप्रकरणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आल्यानंतर व यावरून थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियातून टीका सुरू झाल्यानंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. ज्या तरूणीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार झाल्याचे सांगितले जात आहे, तिनेच आपल्यावर लैंगिक अत्याचार झालेला नाही, असे बयाण बोराखडी पोलिसांना दिले. तसेच, वैद्यकीय तपासणीसही तिने नकार दिला. पीडित तरूणीसोबत असलेल्या नातेवाईक मित्राच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्काराचा आठ नराधमांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल करण्यासाठी आ. संजय गायकवाड हे स्वतः बोराखडी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून बसले होते. या तरूणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, माझ्यावर लैंगिक अत्याचार झालेला नाही. आरोपींनी आमच्याकडील पैसे व मोबाईल नेले. आमचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची व समाजात बदनामी करण्याची धमकी दिली व आरोपी तेथून निघून गेले, असे या तरूणीने सांगितले. तसेच, तिने वैद्यकीय तपासणीस नकारही दिल्याने पोलिसांसमोरील अडचणी आता वाढल्या आहेत. दरम्यान, सदर तरूणी ही विवाहित असल्याची माहिती कळत असून, ती तिच्या मित्रासोबत राजूर घाटातून जात असताना ही घटना घडली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली आहेत. तरूणीचा मित्र व तरूणी यांच्या बयाणामध्ये तफावत आढळून येत असून, ही तरूणी काही तरी दबावात असावी, असा संशयदेखील व्यक्त केला जात आहे.


– बोराखडी पोलिसांकडून कारवाईस टाळाटाळ; आ. संजय गायकवाड यांचा पोलिस ठाण्यात तीन तास ठिय्या
– सामूहिक बलात्कारानंतर आरोपी मोहेगावात पळाले, एकाला जेरबंद करण्यात यश

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – निसर्गरम्य अशा राजूर घाटात सेल्फी घेण्यासाठी थांबलेल्या जोडप्याला लुटत त्यातील ३५ वर्षीय तरूणीला देवीच्या मंदिरामागील दरीत ओढत नेत आठ नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या नृशंस घटनेने राज्यात महिला सुरक्षित नसल्याची बाब पुन्हा एकदा उघडकीस आली असून, या दुर्देवी घटनेने बुलढाणा हादरले आहे. या घटनेची माहिती कळताच आमदार संजय गायकवाड यांनी तातडीने बोराखडी पोलिस ठाण्यात धाव घेतली, व कारवाईस टाळाटाळ करणार्‍या बोराखडी पोलिसांना धारेवर धरत तब्बल तीन तास ठिय्या दिला. अखेर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर व तातडीने तपास सुरू केल्यानंतर आ. गायकवाडांनी आपले आंदोलन मागे घेतले. या तरूणीसोबत असलेल्या तरुणाकडून नराधमांनी ४५ हजार रूपयेदेखील लुटून नेले होते. पीडित तरूणी व तरूणाने त्यांचा पाठलाग केला असता, ते मोहेगाव येथे पळून गेले. गावातील ग्रामस्थांनी एका आरोपीची ओळख राहुल राठोड अशी सांगितली असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

बुलढाणा शहरापासून जवळच मलकापूर मार्गावर राजूर घाटात निसर्गरम्य असे वातावरण असल्याने अनेक जोडपे या घाटात पर्यटन व फिरण्यासाठी येत असतात. त्याप्रमाणे एक तरूणी तिच्या नातेवाईक मित्रासह देवीच्या मंदिर परिसरात सेल्फी घेण्यासाठी थांबले होते. दुपारच्या सुमारास त्या ठिकाणी आलेल्या आठ जणांनी या युवतीला छेडखानी करण्यास सुरूवात केली. तसेच सोबतच्या तरूणाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील ४५ हजार रूपयांची रोख रक्कम लुटून घेतली. या दोघांनाही या टोळक्याने मारहाण करत, यातील तरूणीला ओढत मंदिरामागच्या खोल दरीत नेले. तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. यावेळी तरूणीसोबतच्या तरूणाला त्यांनी धरून ठेवले होते. ही तरूणी जीवाच्या आकांताने ओरडत असताना तिची अजिबात दया या नराधमांना आली नाही. अर्धमेली अवस्थेत ही तरूणी गेली असताना, हे नराधम तरूणीसोबतच्या तरूणाला व तिला सोडून तेथून पळून जाऊ लागले. या नराधमांचा तरूणी व तिच्या मित्राने पाठलाग सुरू केला असता, ते नजीकच्या मोहेगाव गावात शिरले. पीडित तरूणीने आपल्यावरील अत्याचाराची माहिती गावातील ग्रामस्थांना दिल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने एका आरोपीला पकडण्यात आले असून, राहुल राठोड असे त्याचे नाव आहे.

या भयानक घटनेची माहिती पीडितांनी व ग्रामस्थांनी बोराखडी पोलिसांना दिली असता, पोलिस घटनास्थळी आले नाहीत. त्यामुळे या घटनेची माहिती ग्रामस्थांनी आमदार संजय गायकवाड यांना दिली. त्यामुळे आ. गायकवाड हे तातडीने घटनास्थळी आले. तोपर्यंत पीडित तरूणी व तिचा मित्र हा बोराखडी पोलिस ठाण्यात पोहोचले होते. आ. गायकवाड यांनी बोराखडी पोलिस ठाण्यात येत पोलिसांना धारेवर धरले. यापूर्वीदेखील याच राजूर घाटात बरेचदा बलात्काराच्या घटना घडल्या असल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली. मात्र, बदनामीपोटी तक्रारी दाखल केल्या जात नसल्याचेही त्यांनी सांगितले. वेळेवर कारवाई न झाल्याने आमदार संजय गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. घटनेचे गांभीर्य पाहाता, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांनी तातडीने बुलढाणा शहराचे ठाणेदार प्रल्हाद काटकर, धामणगाव बढेचे ठाणेदार भोरकडे, पोलिस निरीक्षक माधवराव गरूड यांना तातडीने बोराखडी ठाण्यात पाठवले. त्यानंतर रात्री उशीरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून, आरोपींचा शोध सुरू केला होता. परंतु, आरोपी गावातून फरार झाल्याचे दिसून आले. दरम्यान, पीडित तरूणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिची प्रकृती चांगली असल्याची माहिती बुलढाण्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी दिली आहे. तथापि, तिला मोठा मानसिक धक्का बसला आहे. पोलिस आरोपीचा कसून शोध घेत असून, ताब्यात घेतलेल्या एका आरोपीची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!