शेतकरीप्रश्नी, राजकारणाचा स्तर खालावल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यातील तरूणाईचे मुंबईत उपोषण
मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील राजकारणाचा स्तर खालावला असून, गंभीर बनलेल्या राज्यातील शेतकर्यांच्या प्रश्नांकडे राज्यकर्ते, राजकीय नेते दुर्लक्ष करत आहेत. या बाबींचा निषेध व शेतकरीप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी बुलढाण्यातील तरूणाईने मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण सुरू केले असून, या उपोषणाचा आज दुसरा दिवस होता. या उपोषणाकडे राज्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष चालविल्याने राज्यभरातील तरूणवर्गात या सरकारविषयी तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी उपाययोजना करा, शेतमालाला भाव देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने ठोस प्रयत्न करावेत, विधानसभा बरखास्त करा व आपआपल्या पक्षाच्या विचारसरणीनुसार निवडणुकांना सामोरे जा, बळीराजाला चोवीस तास शेतीसाठी वीज द्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोधी पक्षाची महत्वपूर्ण भूमिका संविधानात अधोरेखीत केली आहे. त्यामुळे संविधानानुसार विरोधी पक्ष वाचला पाहिजेत, यासह इतर मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातील तरूणांनी गजानन दगडू चित्ते (देऊळगावराजा, जि. बुलढाणा) यांच्या नेतृत्वात कालपासून हे उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाबाबत राज्यपालांना या तरूणांनी नोटीस दिली होती. तरीही सरकारचे कुणीही प्रतिनिधी उपोषणस्थळी आले नाही. तथापि, शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या भिवंडी शहर शाखेने, तसेच महिला आघाडीने अध्यक्ष कविताताई खाडे, शीलाताई रदाळ यांच्या नेतृत्वात आपला पाठिंबा दिला आहे. तसेच, या उपोषणासाठी राजू चित्ते, सुखदेव चित्ते, रहीम पठाण, सुनील चित्ते, समाधान चित्ते या निमगाव गुरू ग्रामपंचायत सदस्यांनीदेखील आपला पाठिंबा दर्शविला असल्याचे उपोषणकर्त्यांनी कळवले आहे.
———-