– मंगळवारी दिंडीसोहळा लोणारनगरीत मुक्कामी
लोणार/बिबी (ऋषी दंदाले) – विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या शेगाव येथील श्री संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचा पंढरपूरवरून परतीचा प्रवास सुरू झाला असून, उद्या (दि.16) हा दिंडीसोहळा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. या पायी दिंडीसोहळ्याचे माळसावरगाव येथे दुपारी एक वाजता आगमन होणार असून, सायंकाळी पाच वाजता हा पालखी सोहळा मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत दाखल होईल. या सोहळ्याच्या स्वागतासाठी सिंदखेडराजा नगरी सज्ज झाली असून, सर्वांना संतांच्या दर्शनाचे वेध लागलेले आहेत.
या दिंडी सोहळ्याच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्यावतीने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहे. परवा दिवशी दिनांक १७ जुलैरोजी पालखीचे जेवण सकाळी ११ वाजता किनगावराजा येथे राहणार आहे. त्यानंतर राहेरी, दुसरबीड, चोरपांग्रामार्गे बिबी येथे संध्याकाळी पाच वाजता आगमन होणार आहे, व पालखीच्या जेवणाची व मुक्कामाची व्यवस्था वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बिबी येथे राहणार आहे. गावांमध्ये ग्रामपंचायतच्यावतीने दिंडी मार्गवर स्वच्छता करण्यात आली आहे. दिनांक १८ जुलैला सकाळी खंडाळामार्गे सकाळी १० वाजता श्री शिवाजी हायस्कूल किनगावजट्टू येथे गावकर्यांच्या व पंचक्रोशीतील नागरिकांच्यावतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे, व त्यानंतर पालखीसोहळा दीपखेड, धायफळ, किन्हीमार्गे दुपारी ५ वाजता लोणार नगरीमध्ये प्रवेश करणार आहे. दिंडी लोणार मुक्कामी राहणार आहे. त्यानंतर पुढील प्रवास सुरू होणार आहे.
———–