राजूर घाटातील विवाहित तरूणीवरील अत्याचारप्रकरणी सात आरोपींच्या मुसक्या आवळल्या!
– तरूणीच्या भूमिकेमुळे धक्कादायक घटनेला वेगळे वळण; सामूहिक बलात्कार झाला की नाही?
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राजूरघाटातील तरूणीवरील अत्याचार प्रकरणाला या विवाहित तरूणीने घेतलेल्या भूमिकेमुळे वेगळे वळण लागले आहे. तिने स्वच्छेने वैद्यकीय तपासणी नाकारल्याने नराधमांविरूद्ध गँगरेप (सामूहिक बलात्काराचे) गुन्हे दाखल होऊ शकणार नाहीत. या तरूणीने कौटुंबीक इभ्रतीपोटी अशी भूमिका घेतली की, खरेच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले नाहीत? हे प्रश्न अनुत्तीर्ण आहेत. तिने वैद्यकीय तपासणी केली असती तर या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असती. या तरूणीच्या भूमिकेमुळे राजूरघाटात अशा प्रकारे मुली व महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्या नराधमांची हिंमत वाढण्याची भीतीही यानिमित्ताने निर्माण झाली आहे. तूर्त तरी हे प्रकरण आता छेडखानी व लूट या गुन्ह्यांभोवती केंद्रीत झाले आहे.
या धक्कादायक तितकेच नृशंस प्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींपैकी सात आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. उर्वरित एका आरोपीचा कसून शोध सुरू आहे. तोही लवकरच अटक होईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याची रवानगी शासकीय बाल निरीक्षक गृहामध्ये करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये राहुल रमेश राठोड (वय २५ रा. मोहेगांव), मंगेश मल्हारी मोरे (वय २३), काजू रमेश राठोड (वय २७) रा. मोहेगांव, विजय उर्फ दयन्या मधुकर बरडे (वय १९) रा. डोंगरखंडाळा, किसन उर्फ श्रीराम बरडे (वय २१) रा. डोंगरखंडाळा यांचा समावेश आहे. इतर दोघे आरोपी हे अल्पवयीन आहेत. या आरोपींपैकी राहुल राठोड आणि मंगेश मोरे या आरोपींना फत्तेपूरहून मोताळ्याकडे येत असतांना डीवायएसपींच्या पथकाने पकडले तर काजू राठोडला त्याच्या घरूनच उचलण्यात आले. इतर चार जण तारापूरच्या जंगलामध्ये लपून बसले होते. त्यांना शोधून पकडण्यात आले.
बुलढाणा उपविभागाचे पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलढाणा येथे एका महिलेला आणि तिच्या नातेवाईकांना लुटल्याप्रकरणी आठपैकी सात आरोपींना अटक करण्यात आली. महिलेने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला होता. तिला वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले असता, तिने नकार दिला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला नसल्याचे स्पष्टपणे लिहून दिले. या प्रकरणाचा अधिक तपास बोराखडी पोलिस करत आहेत.
पीडित महिला गुरुवारी बुलढाण्यातील मलकापूर मार्गावरील राजूरघाटात नातेवाईक मित्रांसोबत फिरायला गेली होती. दरम्यान, या घाटातील देवीच्या मंदिर परिसरात सेल्फी काढण्यासाठी ते थांबले. त्यावेळी आठ जणांचा घोळका त्यांच्याजवळ आला. त्यांनी महिलेसोबत असलेल्या तरुणाकडून रोख रक्कम लुटली आणि तिला दरीत ओढत नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले, अशी तक्रार बोराखेडी पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशीरा दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर संबंधित विवाहित तरूणीने आपला जबाब मात्र वेगळा दिला असून, आपल्यावर बलात्कार झाला नाही, असे तिचे म्हणणे आहे. शिवाय, तिने वैद्यकीय तपासणीदेखील नाकारल्याने या घटनेचे नेमके सत्य बाहेर येणे मुश्कील झाले असून, तिच्या या भूमिकेमुळे आरोपींना मात्र बचावाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
—————